१४ हजार ८०१ विद्यार्थ्यानी दिली शिष्यवृतीची परीक्षा
अमरावती : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) परीक्षा गुरुवार १२ ऑगस्ट रोजी १७४ परीक्षा केंद्रावर घेण्यात आली. शिष्यवृती परीक्षेसाठी इयत्ता पाचवीसाठी ९ हजार ६६५ विद्यार्थ्यानी नोंदणी केली होती. यापैकी ८ हजार ७९५ जणांनी परीक्षा दिली, तर ८७१ विद्यार्थी परीक्षेला गैरहजर होते. याशिवाय इयत्ता आठवीकरीता ६ हजार ६८५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ६००६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे, तर ६८५ जण अनुपस्थित होते. दोन्ही मिळून १६ हजार ३५७ पैकी १४ हजार ८०१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर १५५६ विद्यार्थी गैरहजर असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) एजाज खान यांनी लोकमतला दिली. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून गुरुवारी शहर व जिल्हाभरातील १७४ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा सुरळीत पार पडली आहे.
बॉक्स
पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेला पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी)साठी जिल्ह्यात १०० केंद्रावर ८ हजार ७९५ व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) करिता ७४ केंद्रावर ६००६ विद्यार्थी सहभागी झाले होते.