स्वयंम प्रकल्प : अंगणवाड्यांना करणार अंड्यांचा पुरवठालोकमत न्यूज नेटवर्कधारणी : आदिवासी उपयोजना क्षेत्रामधील अंगणवाड्यांना अंड्यांचा पुरवठा व्हावा व याद्वारे स्वयंरोजगाराची निर्मिती व्हावी, यासाठी २०१७ ते २०२० या कालावधीत स्वयंम प्रकल्प राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत स्वयंरोजगारासाठी मदर युनिटची स्थापना करून कुक्कुटपालनासाठी अनुदान देण्यात येणार आहे. आदिवासी विकास विभाग, महिला व बालकल्याण विभाग, पशुसंवर्धन विभाग आणि ग्रामविकास विभागाद्वारा संयुक्तरित्या हा प्रकल्प जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात खासगी पक्षी संगोपन केंद्र (मदर युनिट) ची स्थापना करण्यात येणार आहे. या युनिटला एक दिवसीय देशी सुधारित जातीचे पिल्ले देण्यात येऊन त्यांचे चार आठवड्यांपर्यंत संगोपन करायचे आहे. या युनिटद्वारा लाभार्थींना पक्षी पुरवठा केल्यानंतर प्रतिपक्षीप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. प्रत्येक कुक्कुटपालक लाभार्थ्यांत पक्ष्यांचा निवारा उभारणीसाठी १५०० रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.मदर युनिटधारक व लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ११ सदस्यीय समिती व तालुकास्तर प्रकल्पाचे सनियंत्रणासाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठित करण्यात येणार आहे. अशी होणार लाभार्थी निवडलाभार्थ्यांची निवड करताना ३० टक्के महिला, तीन टक्के अपंग लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांचा लाभ त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न करण्यात येणार आहे. त्यांच्याकडे रहिवासी दाखला व जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
आदिवासींना कुक्कुट पालनाचे धडे
By admin | Published: May 17, 2017 12:13 AM