अमरावती : बालकांचा मोफत व शिक्षणाचा अधिकार अधिनियमांर्तगत (आरटीई) जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांनी पाठविलेल्या आकडेवारीवरून दिसून येते. २१ जानेवारीपासून नोंदणी सुरू झाली आहे. शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर आतापर्यंत २४७ शाळांपैकी १७८ शाळांनी नोंदणी केली आहे. ६९ शाळांनी अद्यापही नोंदणी केलेली नाही.
शिक्षण हक्क अधिनियम अंतर्गत मागासवर्गीय अपंग व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत प्रवेश मिळावा, याकरिता एकूण प्रवेशक्षमतेच्या २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. पात्र विद्यार्थ्यांना २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश देण्यासाठी दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात शाळांची नोंदणी प्रवेश अर्ज स्वीकारणे आदी प्रक्रिया पार पाडली जाते. सन २०२१-२२ या वर्षात २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश मिळावा याकरिता २१ जानेवारीपासून खासगी शाळांची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. नोंदणीसाठी ३० जानेवारी ही अंतिम मुदत होती. परंतु मुदतीच्या आत अत्यल्प शाळांनी नोंदणी केली. त्यामुळे नोंदणीसाठी १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यात ५ फेब्रुवारीपर्यंत १७८ शाळांनी नोंदणी केली आहे. मात्र, अजूनही ६९ शाळांनी नोंदणी केली नाही. त्यामुळे नोंदणीसाठी केवळ आता चार दिवसांचा अवधी शिल्लक असून अधिकाधिक शाळांनी नोंदणी करावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.
बॉक्स
गतवर्षी २४३ शाळांची नोंदणी
सन २०२०-२१ व्या वर्षात जिल्ह्यातील २४३ इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांनी नोंदणी केली होती. या शाळांमध्ये २४५६ जागा राखीव होत्या.यातील बहूतांश विद्यार्थ्याचे प्रवेश झाले आहेत. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनाही प्रवेश देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश केल्यावर १५८ जागा रिक्त आहेत.
कोट
शिक्षण हक्क अधिनियम अंतर्गत खाजगी शाळांनी नोंदणी करावी अशा सूचना गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत सर्वांना दिल्या आहेत. गतवर्षी नोंदणी केलेल्या शाळांचे नूतनीकरण केले जाणार आहे. १० फेब्रुवारीपर्यंत पात्र सर्व शाळांची नोंदणी होईल.
- ई झेड खान,
प्राथमिक शिक्षणाधिकारी
बॉक्स
नोंदणी केलेल्या तालुकानिहाय संख्या
अचलपूर ३, अमरावती १५, महापालिका क्षेत्र ५८, अंजनगाव सुजी १७, भातकुली ७, चांदूर बाजार १६, चांदूर रेल्वे ५, चिखलदरा ००, दर्यापूर ११, धामणगाव रेल्वे ९, धारणी २, मोर्शी १६, नांदगाव खंडेश्र्वर३, तिवसा ३ आणि वरूड १३ अशा १७८ शाळांनी नोंदणी केली आहे.