लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना संसर्ग ओसरताच शहरी भागात आठवी ते बारावी आणि ग्रामीणमध्ये पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. आता शासनाने २० ऑक्टोबरपासून महाविद्यालये सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे दीड वर्षापासून बंद असलेली महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी संस्थाचालकांना विद्यार्थी सुरक्षेची काळजी घ्यावी लागेल, हे विशेष. विद्यार्थ्यांमध्ये मात्र आनंदाचे वातावरण आहे. जिल्ह्यात एकूण ११८ महाविद्यालये असून, २ लाख २५ हजारांच्या घरात विद्यार्थिसंख्या आहे. कोरोना नियमावलींचे पालन करून महाविद्यालये सुरू व्हावीत, अशी अपेक्षा विद्यार्थी, पालकांची आहे. मुळात किती विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले? जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत, तथापि प्रवेश अमरावती शहरातील महाविद्यालयात आहे, अशा विद्यार्थ्यांचे लसीकरणाची काय स्थिती असेल, हे तूर्त कळू शकले नाही. मात्र, राज्य शासनाने महाविद्यालये सुरू करण्याची घोषणा केली. संस्थाचालक कर्मचारी, विद्यार्थ्यांचे लसीकरणाबाबत आता नियोजन करण्यात येईल, असे दिसून येते. मात्र, दिवाळीपूर्वी कॉलेज सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये ही बाब आनंदाची ठरली आहे.
कोणत्या महाविद्यालयात काय काळजी घेतली जातेय? महाविद्यालये उघडण्याचा निर्णय झाला. त्याबाबत गाईडलाईन पाळले जाईल. सॅनिटायझेशन, शारीरिक अंतराचे पालन, नो मास्क, नो एन्ट्री, अनावश्यक गर्दी टाळली जाईल.- आराधना वैद्य, प्राचार्य, भारतीय महाविद्यालय
महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय योग्य आहे. जिल्हाधिकारी जे काही गाईडलाईन देतील, त्याचे पालन केले जाईल. वर्गखोल्यांची क्षमता बघून नियोजन केले जाईल. विद्यार्थी क्षमतेप्रमाणे नियोजनाला प्राधान्य असेल.-राजेश देशमुख, प्राचार्य, बॅ. आरडीआयके व केडी, बडनेरा.
शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरू झाली. आता वरिष्ठ महाविद्यालये कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून सुरू करण्याचा निर्णय अतिशय स्तुत्य आहे. शिक्षणापासून दूर गेलेले विद्यार्थी पुन्हा प्रवाहात येतील. हा निर्णय कोरोनाची दुसरी लाट ओसरताच व्हायला हवा होता. -राजेश वाटाणे, विद्यार्थी, केशरबाई लाहोटी महाविद्यालय
राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करून महाविद्यालयात ये-जा केली जाईल. गत दीड वर्षापासून कॉलेज बघितले नव्हते. आता दिवाळीपूर्वीच महाविद्यालये सुरू होणार असल्याने आनंद आहे. - पराग वानखडे, विद्यार्थी, विद्याभारती कॉलेज ऑफ फार्मसी