लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नेहमीप्रमाणे त्या बसची प्रतीक्षा करीत बसथांब्यानजीक बसलेल्या. अनेकींच्या चेहऱ्यावर त्रासिक त्राण. अचानक त्यांच्याजवळ वाहनांचा काफिला थांबतो. त्या दचकतात, पण चेहरा ओळखीचा दिसल्याने हरखतातदेखील. त्या त्यांच्यासोबत गप्पा करतात अन् त्यांना लिफ्टदेखील देतात. १४ डिसेंबर रोजी तिवसा तालुक्यातील मोझरी बस थांब्यावरचा हा प्रसंग. त्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना लिफ्ट देणाऱ्या चक्क राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर होत्या. तिवसा तालुक्यातील फत्तेपूर येथील काही विद्यार्थी परतीच्या प्रवासासाठी मोझरी बस थांब्यावर ताटकळत होते अन् नेमक्या याच वेळी ना. यशोमती ठाकूर या अमरावतीकडे जात होत्या. त्यांनी आपली गाडी थांबविण्याची सूचना चालकाला केली अन् त्या थेट पोहोचल्या विद्यार्थ्यांमध्ये. ना. ठाकूर यांना बघून गोंधळलेल्या विद्यार्थ्यांनी भीड चेपल्यानंतर वाहनाच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगितले. ना. ठाकूर यांनी क्षणात त्यांना आपल्या गाडीत बसवून थेट गावी फत्तेपूर इथे पोहचवून दिले.
आनंदाचे डोही आनंद तरंगकाही किलोमीटरच्या या प्रवासात पालकमंत्री अन् विद्यार्थी यांच्यात चांगल्याच गप्पागोष्टी रंगल्या. हे सहज घडलेय. पण, पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासोबतचा प्रवास अन् गप्पाही हा प्रसंग मात्र त्या विद्यार्थ्यांसाठी कायम आठवणीत राहणारा अन् ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ असाच ठरला.