शिक्षकांचा टाहो: तीन महिन्यांपासून वेतन नाहीअमरावती : जिल्हा परिषदेतून महापालिका शाळांमध्ये हस्तांतरित झालेल्या १०१ शिक्षकांच्या वेतनाचा गुंता अद्यापही कायम आहे. ५० टक्के राज्य शासन आणि महापालिका असे या शिक्षकांच्या वेतनाचे सुत्र ठरले असतानाही नियमित वेतन होत नसल्याची ओरड कायम आहे. त्यामुळे या शिक्षकांनी शनिवारी उपायुक्तांची भेट घेवून वेतनाबाबतची कैफीयत मांडली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे गोपाळ कांबळे, योगेश पखाले यांच्या नेतृत्वात शिक्षक वृंदानी उपायुक्त विनायक औगड, लेखापाल शैलेंद्र गोसावी यांना निवेदन सादर करुन आपबीती कथन केली. मराठी, हिंदी व उर्दू माध्यमांच्या शिक्षकांचे मागील तीन महिन्यापासून वेतन थकीत आहे. हल्ली रमजान महिना सुरु झाला असून मुस्लिम समाजातील शिक्षकांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे. १२ जुलै पर्यत थकीत वेतन अदा करण्यात आले नाही तर शिक्षक काम बंद आंदोलन करुन प्रशासनाचा निषेध करतील, असा इशारा देण्यात आला आहे. तीन महिन्यापासून वेतन नाही, आयुर्विमा, सोसायटीची रक्कम पाठविण्यात आली नसल्याने शिक्षकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे, असे शिक्षकांनी सांगितले. यावेळी आंदोलनात योगेश पखाले, प्रकाश आराध्य, दा.रा. सावरकर, जा. श्री. काकड, उध्दव वाकोडे, अ. जमील अ. जब्बार, जफरुल्ला खान, विजय घुंडीयाल, रोशन देशमुख, मुजफफर अहमद, तानाजी केंद्रे, संध्या वासनिक, चेतना बोंडे, सीमा ठाकूर, दीपाली दळवी, वनिता सावरकर, ज्योती मदने आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)
आमचे वेतन द्या हो ऽऽऽ
By admin | Published: July 05, 2014 11:19 PM