अमरावती : ‘चला शाळेमध्ये श्रमदान करू, शैक्षणिक समानतेची गुढी उभारू’ असा संदेश देत शालेय शिक्षण, जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शनिवारी गुढीपाडव्याला बेलोरा येथील जिल्हा परिषद शाळेत श्रमदान केले व शैक्षणिक समतेची गुढी उभारण्याचे आवाहन केले. यावेळी शाळेचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला.
शिक्षणातील विषमता संपवणे आवश्यक आहे. समाजातील गरीब, वंचित, कष्टकरी, शेतकरी वर्गातील विद्यार्थ्यांनाही चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. त्यामुळे मराठी नववर्षाच्या स्वागतानिमित्त शैक्षणिक समतेची गुढी उभारण्याचा संकल्प केला आहे, असे प्रतिपादन राज्यमंत्री कडू यांनी यावेळी केली. राज्यमंत्र्यांनी स्वत: परिश्रम करून सहभागी नागरिकांना श्रमदानासाठी प्रोत्साहित केले. शाळेच्या परिसरातील कचरा हटवून सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला.
उपक्रमाद्वारे शाळांची गुणवत्ता सुधारण्याचा प्रयत्न करण्यात येईल. मी या शाळेत शिकलो. शाळेच्या स्मृती मनात कायम आहेत. माझ्या मातोश्रींच्या स्मृतिनिमित्त दोन लाख रुपये या शाळेला देऊन विविध सुविधा उभारण्यात येतील. ही शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची करण्याचा ध्यास सर्वांनी घेतला आहे. अद्ययावत शैक्षणिक सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात येतील. केवळ बेलोऱ्यापुरते नव्हे, तर राहुटी उपक्रमाच्या धर्तीवर दर पंधरवड्याला हा उपक्रम विविध गावांतील शाळांत राबवू. दुर्लक्षित भागातील शाळांचे रूप पालटण्यात येईल. तिथे आवश्यक त्या सुविधा उभारण्याचा प्रयत्न राहील. या उपक्रमाची मुहूर्तमेढ आज गुढीपाडव्यानिमित्त करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले. या उपक्रमात अनेक कार्यकर्ते, महिला, ज्येष्ठ, युवक सहभागी झाले होते.