अमरावती : वैयक्तिक शौचालय घोटाळ्यात नस्तीवर ज्या अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी आहे व त्यांनी त्या नाकारल्या आहेत. त्यामुळे याची सत्यता पडतळणीसाठी पोलीस आयुक्तांना पत्र देणार असल्याचे उपायुक्त चौकशी समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी सांगितले. महापालिकेच्या आमसभेत सदस्यांद्वारा ही मागणी करण्यात आली होती व प्रकरणात एफआयआर दाखल असल्याने पोलीस विभागाला पत्र देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
महापालिकेच्या बडनेरा झोन क्रमांक चार मधील वैयक्तिक शौचालय बांधकामात १,३७२ शौचालयांचे बांधकाम न करता २ कोटी ३३ लाख २४ हजार रुपयांची देयके प्रदान करून घोटाळा केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात नस्तीवर नमूद स्वास्थ्य निरीक्षक, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक, संबंधित सहायक आयुक्त, वौद्यकीय आरोग्य अधिकारी (स्वच्छता), मुख्य लेखाधिकारी, मुख्य लेखापरीक्षक, सहायक आयुक्त (मुख्यालय) व उपायुक्त (सामान्य) यांना चौकशीसाठी त्रिद्स्यीय समितीसमोर पाचारण करण्यात आले व त्यांच्याकडून लेखी खुलासाही घेण्यात आला. यात बहुतेक अधिकाऱ्यांनी नस्तीवरील सही नाकारली आहे. या प्राथमिक अहवालावर शुक्रवारच्या आमसभेत चर्चा करण्यात आली असता, पुढच्या आमसभेत अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. त्यामुळे या प्रकरणाला आता गती आलेली आहे.
बॉक्स
डीई सुरू करण्यासाठी या आठवड्यात पत्र
या प्रकरणात कुणाचाही मुलाहिजा केला जाणार नाही, अशी स्पष्टोक्ती महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी आमसभेत दिली व दोषींवर विभागीय चौकशी करण्यात येणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केल्याने या विषयाला आता गती आलेली आहे. जबाबदारी कुणाची, दोषी कोण, याबाबतचा निर्णय अत्यंत विचारपूर्वक घेतल्या जाणार आहे. विभागीय चौकशीसाठी शासननियुक्त अधिकारी आहेत. त्यांच्याद्वारा ही चौकशी होईल व काही अधिकारी राज्य शासनाच्या सेवेतील असल्याने हा निर्णय मंत्रालयस्तरावर होणार असल्याचे उपायुक्त पाटील म्हणाले.