उच्चायुक्तांनाही कळविली माहिती : देशभरातील पोलीस यंत्रणा चौकसलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नायजेरियन रहिवाशांना अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त विदेश मंत्रालयाला पत्राद्वारे कळविणार आहे. तत्पूर्वी ही माहिती नायजेरीयन येथील उच्चायुक्तांनाही कळविण्यात आली आहे. या टोळीने आणखी गुन्हे केले असण्याची शक्यता पाहता त्यांची माहिती देशभरातील पोलीस यंत्रणेला वायरलेसद्वारे कळविण्यात आलेली आहे. शहरातील विष्णू नगरातील रहिवासी कैलास शिवप्रसाद तिवारी (५९) यांची ६७ लाख ९९ हजाराने फसवणूक झाल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदविले होते. याप्रकरणात अमरावती पोलिसांनी माईक केवीन फिलीप ऊर्फ बोबो ऊर्फ डॉ.कॉसमॉस व एमेका फेवर इफेसिनाची या दोन नायजेरियन नागरिकांसह भारतीय महिला सुकेशिनी संतोष धोटे ऊर्फ स्नेहा पाडुरंग देरकर ऊर्फ आदिती शर्मा यांना मुंबईवरून अटक केली. त्यांची पोलीस कोठडीत कसून चौकशी केली. त्यांनी केलेल्या बँक व्यवहारांची चौकशी पोलीस करीत असून यासंदर्भात संबंधित बँकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. नायजेरीयन आरोपींची चौकशीत त्यांच्या भाषेत संवाद साधण्यास पोलिसांना अडसर निर्माण झालेला आहे. पोलीस आता नायजेरियन भाषेशी परिचित व्यक्तीचा शोध घेत आहे. त्याकरिता पोलिसांनी अमरावती विद्यापीठाशी संपर्क साधला असून तेथील प्राध्यापक किंवा विद्यार्थ्यांची आरोपींशी संवाद साधण्यासाठी मदत घेतली जाणार आहे. लॅपटॉप, मोबाईलमधील माहिती गुलदस्त्यातनायजेरियन टोळीकडून जप्त करण्यात आलेले तीन लॅपटॉप व १६ मोबाईलचा या गुन्ह्यात कशाप्रकारे उपयोग करण्यात आला, याची चाचपणी पोलिसांनी सुरू केली आहे. मात्र, लॅपटॉप व मोबाईलमधील पासवर्ड आरोपींकडून माहिती करून घेण्यास अडसर निर्माण होत आहे. त्यामुळे त्यातील माहिती बाहेर काढण्याचे प्रयत्न पोलिसांनी चालविले आहेत. गोव्यातही असाच गुन्हा, पोलिसांची पडताळणीया टोळीने देशभरात किती गुन्हे केलेत, याची चौकशी पोलीस करीत आहे. दरम्यान वायरलेसद्वारे भारतातील सर्व पोलीस यंत्रणेला नायजेरियन टोळीबाबत कळविण्यात आले आहे. त्या अनुषंगाने गोवा पोलिसांनी अमरावती पोलिसांशी संपर्क साधला आहे. गोवा येथील एका व्यापाऱ्याची याच पद्धतीने २ कोटीने फसवणूक करण्यात आली आहे. या घटनेशी नायजेरियन टोळीचा काही संबंध आहे किंवा नाही, याची चौकशी पोलिसांनी आरंभली आहे.
नायजेरियन टोळीसंदर्भात विदेश मंत्रालयाला पत्र
By admin | Published: June 13, 2017 12:02 AM