तिवसा (अमरावती) : राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची १११ वी जयंती अर्थात ग्रामजयंती महोत्सव गुरुवारी जन्मभूमी यावली शहीद गावात पहाटे ५.३० वाजता पार पडला. गावात दिव्यांचा लखलखाट करण्यात आला. मात्र, दरवर्षी असलेली हजारोंची उपस्थिती यंदा अनुयायांनी टाळली.
ग्रामजयंती महोत्सव दरवर्षी राज्यभर ३० एप्रिलला गुरुदेवभक्त उत्साहात साजरा करत असतात. परंतु, यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने घरीच राष्ट्रवंदना गाऊन ग्रामजयंती साजरी करावी, असे आवाहन गुरुदेवभक्तांना करण्यात आले आहे. जन्मभूमी यावली शहीद गावात यावर्षी कोरोनाचे सावट लक्षात घेता केवळ पाच गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत सामाजिक अंतर राखून पहाटे ५.३० वाजता ग्रामजयंती महोत्सवाचा सोहळा पार पडला.
तत्पूर्वी गावातील लोकांनी सामाजिक अंतर राखून संपूर्ण गाव स्वच्छ करून घेतले. प्रत्येक घरासमोर रांगोळ्या तसेच दिव्यांच्या मंद प्रकाशात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जन्मभूमी न्हाऊन निघाली होती.
लढवय्यांप्रति कृतज्ञता जिवाची पर्वा न करता डॉक्टर, आरोग्य सेवक, पोलीस, प्रशासकीय अधिकारी, पत्रकारांसोबतच जे अदृश्य हात कोरोनाविरुद्ध लढा देत आहेत, अशा सर्व लोकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. घरोघरी राष्ट्रासाठी प्रार्थना करून ग्रामजयंती साजरी करण्यात आली. अखिल भारतीय श्रीगुरूदेव सेवा मंडळाच्या राज्यात २३ हजार शाखा आहेत, हे येथे विशेष.
महासमाधी फुलांनी सजलीगुरुकुंज मोझरी स्थित तुकडोजी महाराज यांची महासमाधी फुलांनी सजवण्यात आली होती. अनेक गुरुदेवभक्तांनी तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर समाज माध्यमांतून प्रकाश टाकला. मानवता फाउंडेशन (गुरुकुंज मोझरी) व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंचच्या सदस्यांनीही घरी राहून ग्रामजयंती साजरी केली.