अमरावती : आरटीई प्रवेशासाठी यंदा राज्यस्तरावरून ऑनलाईन सोडत काढण्यात आल्यानंतर १५ एप्रिलपासून एसएमएसद्वारे प्रवेशाची माहिती उपलब्ध झाली असली तरी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. राज्यात शासनाने कारोनोमुळे ३० एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लावले आहेत. त्यामुळे आरटीई प्रवेशप्रक्रिया लांबण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आता ही प्रक्रिया मे महिन्यात होऊ शकेल.
जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी २ हजार ७६ जागांसाठी जवळपास ५९१८ अर्ज ऑनलाईन दाखल झाले होते. त्यापैकी १९८० विद्यार्थ्यांची लॉटरीद्वारे प्रवेशासाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेशासाठी शिक्षण विभागाने पडताळणी समितीकडे गर्दी करू नये, असे आवाहन केले आहे.
बॉक्स
संकेत स्थळावर प्रवेशाबाबत खात्री करा
प्रवेशप्रक्रिया २०२१-२२ या वर्षाकरिता लॉटरीद्वारे पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना १५ एप्रिलपासून एसएमएसवर अवलंबून न राहता, आरटीई पोर्टलवर प्रवेशासाठी अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती किंवा प्रवेशाची तारीख पाहता येईल. प्रवेश घेण्याची तारीख पोर्टलवर दाखविली जाईल. ज्या ठिकाणी लाॅटरीमध्ये निवड झालेली आहे. त्यांनी प्रवेशाकरिता एसएमएसद्वारे पुढील सूचना प्राप्त झाल्यानंतर पडताळणी समितीकडे जावे, असे आवाहनदेखील संकेतस्थळावर करण्यात आले आहे.
बाॅक्स
आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच प्रवेश
आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच प्रवेश दिला जाणार असल्याने पालकांनी आवश्यक कागदपत्रे जमा करून ठेवण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. आरटीई संकेत स्थळावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकांनी पडताळणी समितीकडे गर्दी करू नये. प्रवेशाबाबत लॉकडाऊन संपल्यानंतर संकेतस्थळावर सूचना देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.