इंदल चव्हाण
अमरावती : कोरोना काळात जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी राज्य शासनाला ऑक्सिजन टँकसंदर्भात प्रस्ताव पाठविला होता. त्याला मजुरी मिळाली असून, रविवारी लिक्विड ऑक्सिजन टँकची उभारणी करण्यात आली असून, प्रत्येक वॉर्डात पाईपलाईन येत्या आठवड्यात करण्यात येणार आहे.
कोरोना काळात रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची आवश्यकता भासली. दरम्यान सिलिंडर उपलब्ध न होऊ शकल्याने अनेकांना योग्य उपचारापासून वंचित राहावे लागले. जिल्ह्यात ही स्थिती उदभवू नये, यासाठी महाराष्ट्र शासनाने आवश्यकतेनुसार लिक्विड ऑक्सिजन टँक निर्मितीकरिता जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक जिल्ह्यातून प्रस्ताव मागविला होता. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी पाठविलेल्या प्रस्तावानुसार मंजूर होऊन त्याची उभारणी सुरू करण्यात आलेली आहे. लिक्विड ऑक्सिजन टँकचे कंत्राट औरंगाबाद येथील सागर गॅसेस प्रायव्हेट लिमिटेडला दिलेला असून, पाच वर्षांपर्यंत त्याचे मेन्टेनंसची जबाबदारी दिलेली आहे. रविवारी टॅंकसह वेपोरायजरची उभारणी करण्यात आली आली. पाईपलाईनचे काम पुढील आठवड्यात केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बॉक्स
अशी होणार ऑक्सिजनची निर्मिती
जिल्हा सामान्य रुग्णालयातील वॉर्ड १५ नजीक १० हजार किलो लिटर क्षमतेची लिक्विड ऑक्सिजन टाकी उभारलेली आहे. त्यात ७५० मोठे सिलिंडरमध्ये बसतील तेवढे ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. टँकमधून लिक्विड वेपोरायजरमध्ये जाईल. तेथून ऑक्सिजनची निर्मिती होऊन आयसीयू, उपचार वार्ड कक्ष, सारी व अन्य महत्त्वाच्या वॉर्डात पाईपलाईनद्वारे ऑक्सिजनचा रुग्णांना पुरवठा होणार आहे. त्यात किती लिक्विडचा वापर झाला, याची माहिती होणार असल्याने किमान दीडशे सिलिंडर इतके लिक्विड शिल्लक असतानाच सागर गॅसेस कंपनीला कळवावे लागणार आहे. त्यानंतर औरंगाबादहून टॅंकरद्वारा लिक्विड उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती सागर गॅसेस प्रा. लि.चे व्यवस्थापक वेणुगोपाल झंवर यांनी लोकमतला दिली.
कोटलिक्विड ऑक्सिजन टँकचे रविवारी फाऊंडेशन केले. आवश्यकतेनुसार वार्डांत पाईपलाईन केलेली आहे. मात्र, वेपोरायजरपासून मुख्य सेंटरपर्यंत कनेक्शन सदर कंत्राटदाराकरवी पुढील आठवड्यात जोडले जाईल. त्यानंतर रुग्णांना थेट लिक्विड ऑक्सिजनची सुविधा प्राप्त होईल.
- श्यामसुंदर निकम,
जिल्हा शल्यचिकित्सक