अमरावती : एक अत्यंत वर्दळीचा रस्ता. रस्त्यावर रांगेने महाविद्यालये, वसतीगृहे. विद्यार्थी, विद्यार्थिनींचा राबता. रस्त्यावरील गजबजलेला एक महत्त्वाचा चौक.चौकात रुग्णालये, मार्केट, हॉटेल, रिक्षास्टँड, बसथांबा. महिला-मुलींचा आणि अबालवृद्धांचा दिवसभर वावर. चौकातच पोलीस ठाणेही आणि पोलीस ठाण्यालगत भररस्त्यावर दिवसभर दारू पिणारे लोक.बिहारमध्ये शोभावा असा हा प्रकार आपल्या सुसंस्कृत अमरावती शहरात राजरोसपणे अनेक दिवसांपासून सुरू आहे. 'लोकमत'ने केलेल्या 'स्टिंग ऑपरेशन'मधून हे भयंकर वास्तव उघड झाले आहे.सीपी करणार का ठाणेदारावर कारवाई ?महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधन्य असेल, गुन्हेगारीचा दर आणि पोलिसांमध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार मी कमी करेन, अशी घोषणा करणाऱ्या अमरावतीच्या नवनियुक्त पोलीस आयुक्त आरती सिंह 'लोकमत'ने उघड केलेल्या या जळजळीत पुराव्यांची दखल घेतील काय? पहिल्याच दिवशी नागरिकांना त्यांनी दिलेला शब्द त्या पाळतील काय? गाडगेनगर पोलीस ठाण्यालगत राजरोसपणे हे घडू देणाऱ्या ठाणेदारावर त्या कारवाई करतात की, काही कारणे सांगून बेकायदा वृत्तीला बळ देतात, याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले असेलच!गाडगेबाबांची समाधी हाकेच्या अंतरावर, यशोमती ठाकूर घेणार का दखल?दिवसभर आणि रात्रीही ज्या मुख्य मार्गावर दारू ढोसली जाते त्याच मार्गावर व्यसनमुक्तीची देशभर चळवळ राबविणाऱ्या गाडगेबाबांचे समाधीमंदीर आहे. जगविख्यात गाडगेबाबा मंदीरमार्गावर वावरणाऱ्या दारूड्यांमुळे, उघडपणे चालणाऱ्या दारूच्या गुत्त्यामुळे गाडगेबाबांच्या विचारांनी प्रेरित होऊन दूरदूरून येणारे अभ्यासक, भक्त, अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ते बुचकाळ्यातच पडतात. महिला सुरक्षेलाही धोका पोहोचला आहे. गाडगेबाबांच्या विचारांवर चालणाऱ्या जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर गंभीर दखल घेतील काय?
पोलीस ठाण्याच्या भिंतीवर दारूच्या बाटल्याशेगाव नाका चौकात हा प्रकार खुलेआम चालतो. त्याच चौकात गाडगेनगर पोलीसठाणे आहे. दारू पिणाऱ्यांना या ठाण्याच्या भिंतीचा मोठा उपयोग होतो. दारूच्या पावट्या, गार पाण्याच्या बाटल्या आणि डिस्पोजेबल ग्लासेस पोलीसठाण्याच्या भिंतीवर ठेवले जातात. दारू पिऊन झाल्यावरही बाटल्या भिंतीवरच असतात. बघूनही पोलीस आंधळे झाल्याने त्या मार्गावरून जा-ये करणाऱ्यांना आणि रहिवाशांना कायम असुरक्षिततेची भावना असते.