अमरावती : महाराष्ट्रात दारूची दुकाने वाढताहेत आणि शाळा कमी होताहेत ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. हा महाराष्ट्र डॉ. पंजाबराव देशमुख यांचा महाराष्ट्र असल्याचा विसर भाजपला पडला आहे. देवेंद्र फडणवीस यांना जर इडी, पक्षफोडीच्या राजकारणातून वेळ मिळाला असेल तर त्यांनी गरीब मायबाप जनतेचे प्रश्न सोडवा, जनतेला आरोग्य सेवा मिळते की नाही याकडे लक्ष द्यावे, असा घणाघात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी केला.
अमरावतीमध्ये शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करण्यासाठी सुप्रिया सुळे या अमरावतीमध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, नांदेड आणि संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूला सरकारच जबाबदार आहे. त्यामुळे आरोग्य खात्याच्या मंत्र्यांचा तातडीने राजीनामा सरकारने घेतला पाहिजे. राज्यात बेरोजगारी, महागाई, दुष्काळ अशा अनेक प्रश्न आहेत. परंतु सरकाराचे याकडे दुर्लक्ष आहे. सरकारच्या कंत्राटी नोकरभरतीला राष्ट्रवादी कॉँग्रेसचा पूर्णपणे विरोध आहे. जर कत्राटवरच जर राज्य चालवायचे असेल तर मग सरकार कशासाठी आहे, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
राज्यात सध्या दारूची दुकाने वाढत असून शाळा कमी होत असून ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. हे आयईस सरकार म्हणजेच इन्कमटॅक्स, इडी, आणि सीबीआयचा दुरुपयोग करुन आलेले सरकार आहे. या ट्रिपलइंजिन सरकारमध्ये एकही जनतेच्या हिताचे निर्णय झालेले नाहीत. त्यामुळे जर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जर इडी, सीबीआय, पक्षफोडीतून वेळ मिळाला असेल तर त्यांनी मायबाप जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी भाजपवर केला. यावेळी पत्रकार परिषदेला माजीमंत्री अनिल देशमुख, हर्षवर्धन देशमुख सुनिल वऱ्हाडे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष हेमंत देशमुख उपस्थित होते.