प्रदीप भाकरे
अमरावती: मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या कृती आराखडयादरम्यान ग्रामीण पोलिसांकडून जिल्ह्यातील २२ पोलिस ठाण्यातील विविध कारवाईत जप्त केलेली सुमारे ४७ लाख ७४ हजार रूपयांची दारू नष्ट करण्यात आली. रविवार, १३ एप्रिल रोजी कोंडेश्वरलगत ती कारवाई करण्यात आली.
राज्यशासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयान्वये क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयासाठी १०० दिवसांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्या अंतर्गत पोलीस स्टेशनला बऱ्याच कालावधीपासुन प्रलंबित असलेल्या मुद्देमाल निर्गतीची विशेष मोहिम ग्रामीण पोलिसांकडून राबविण्यात आली. जिल्हयातील विविध पोलीस स्टेशनला एक हजार रूपयांवरील दारूबंदी अधिनियमाखालील दारूचा मोठा मुद्देमाल बऱ्याच वर्षांपासून व प्रलंबित असल्याने अपर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांनी स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख तथा पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांना त्याबाबत कायदेशिर प्रक्रिया करण्याचे आदेश दिले होते. त्या अंतर्गत एलसीबीने राज्य उत्पादन शुल्क विभागाशी २२ पोलीस स्टेशनचा मुद्देमाल नष्ट करण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला. !त्याला जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळाल्यानंतर १३ एप्रिल रोजी तो मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
५४६ गुन्हयातील होती दारू साचलीराज्य उत्पादन शुल्क अधिकारी प्रशांत वानखडे व संतोष वायाळ यांच्या उपस्थितीत अचलपुर येथील १२ गुन्हे, परतवाडा ३०, चांदुर बाजार ४०, शिरजगाव २२, सरमसपुरा ७, मोर्शी ३०, बेनोडा ५३, शिरखेड १२, नांदगाव खंडेश्वर १०, माहुली १८, खोलापुर ४३, कुऱ्हा २०, चांदुर रेल्वे ६, तळेगाव ४६, मंगरूळ दस्तगिर २१, येवदा १७, खल्लार २२, अंजनगाव ६३, पथ्रोट ८ गुन्हे, रहिमापुर १०, धारणी ३३ व चिखलदरा २३ अशा एकुण ५४६ गुन्हयातील ६९ हजार ४१२ शिश्या देशी विदेशी दारू नष्ट करण्यात आली. पोलीस अधिक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख किरण वानखडे, जिल्हा वाहतूक निरिक्षक सतिश पाटील व संबधित पोलीस स्टेशन प्रभारी व हेडमोहरर यांनी पार पाडली.