गुरुकुंज मोझरी : साहित्याचा अभ्यास, संशोधन किंवा चिंतन व्हावे, याकरिता साहित्य संमेलनाची आवश्यकता असते. राष्ट्रसंतांच्या साहित्याचा जेवढा अभ्यास करावा तेवढा तो अभ्यासकाला अंतर्मुख करावयास लावतो. शब्दांचे चिंतन करणे सोपे असते; परंतु साहित्याचे चिंतन करणे कठीण आहे. आजच्या काळातही राष्ट्रसंतांचे विचार प्रेरणादायी असल्यामुळे साहित्य संमेलनातून साहित्यिकांनी राष्ट्रसंतांचे विचार जनसामान्यांपर्यंत नेले पाहिजे, असे प्रतिपादन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर यांनी केले.गुरुकुंज आश्रम येथे आयोजित सातव्या विदर्भस्तरीय वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाचे उद्घाटनावेळी ते बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी देऊळगाव राजा येथील व्यंकटेश महाविद्यालयाचे प्राचार्य गजानन जाधव होते. प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश वाघ, सरचिटणीस जनार्दन बोथे, सुभाष लोहे, कार्यकारिणी सदस्य भानुदास कराळे, अरुण मेश्राम, राजेंद्र नाईकवाडे उपस्थित होते. राष्ट्रसंतांच्या संपूर्ण साहित्यात ग्रामोद्धाराचा मार्ग दाखविणारी ग्रामगीता ग्रंथ समाजाला प्रकाश देणारा दीपस्तंभ आहे. राष्ट्रसंतांच्या साहित्यात ग्रामविकास, शिक्षण, आरोग्य व राष्ट्रभक्ती या सर्वांचा मेळ दिसून येतो. संसार व परमार्थ यांची सांगड घालून समाजाला मानवतेची सेवा करण्याचा सेवाधर्म राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिल्याचे यावेळी जयपूरकर म्हणाले. माणसाला मानव करण्याचे काम राष्ट्रसंतांनी केले असून त्यांच्या साहित्यातून प्रेरणा घेऊन साहित्यिकांनी माणूस घडविण्याचे काम केले पाहिजे. आध्यात्मिक उन्नती हेच साहित्याचे प्रयोजन आहे.सर्वाधिकारी प्रकाश वाघ यांनी मार्गदर्शन केले. सुभाष लोहे यांनी आपल्या प्रास्ताविकातून आतापर्यंत झालेल्या साहित्य संमेलनाचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे संचालन दिलीप कोहळे यांनी केले. यावेळी तुकाराम पाटील बोराडेकर लिखित 'तुकड्या म्हणे लागला रंग भजनाचा' या पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. जैविक व सेंद्रीय शेती करणारे शेतकरी सुरेश हरडे (शेंदूरजना मा.), महेंद्र भुयार (कापूसतळणी), बाबाराव डहाके (आष्टी श.) या शेतक-यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. साहित्य संमेलनाची सुरुवात गुरुदेव हमारा प्यारा या संकल्पगीताने करण्यात आली. तसेच कार्यक्रमापूर्वी स्वरगुरूकुंजाचे यातील कलाकारांनी राष्ट्रसंतांनी खंजेरी भजने सादर केली.साहित्य संमेलनापूर्वी राष्ट्रसंतांच्या समाधी स्थळावरून ग्रंथ दिंडी काढण्यात आली. या संमेलनात प्राचार्य अरविंद देशमुख, श्रीराम महाविद्यालय कु-हा यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद घेण्यात आला. यामध्ये 'सब का हो विश्वास प्रभूपर' या विषयावर डॉ. सूर्यप्रकाश जयस्वाल, यवतमाळ, ग्रामगीतेतील मातृशक्ती आणि राष्ट्रनिर्माण या विषयावर शलाखा जोशी नागपूर, राष्ट्रसंतांच्या काव्यातील देशभक्ती या विषयावर कोमल ठाकरे कोराडी यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर रायपूरकर नागपूर यांनी केले. समारोपीय कार्यक्रमाचे मार्गदर्शन ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी केले. अध्यक्षस्थानी हरिभाऊ वेरूळकर होते. या सूत्रसंचालन अरुण मेश्राम यांनी केले. संमेलनासाठी अध्यात्म विभागाचे प्रमुख राजाराम बोथे, मानव सेवा छात्रालयाचे अधीक्षक अमोल बांबल, अरविंद राठोड, भारतीय विचार मंचाचे नीलेश जोशी, जीवन भोंगाडे, सुदर्शन डेहणकर, रूपेश राऊत यांनी सहकार्य केले.
''राष्ट्रसंतांचे विचार जनसामान्यांपर्यंत साहित्यिकांनी नेले पाहिजे''
By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2019 6:00 PM