अमरावती : मोबाईल ॲपवर झालेली ऑनलाईन ओळख, त्यानंतर फुललेले प्रेम, शारीरिक संबंध अन् लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतरही तरुणाने व त्याच्या कुटुंबीयांनी लग्नाला नकार दिल्याने पीडितेने पोलीस ठाणे गाठले.
याप्रकरणी स्थानिक फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपी भूषण संजय तायडे (३१, मुक्ताईनगर, जि. जळगाव) विरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. २३ एप्रिल ते ८ सप्टेंबर या कालावधीत आरोपीने आपल्याशी बळजबरी केल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.
तक्रारीनुसार, १४ फेब्रुवारी रोजी दोघांची एका ॲपवर ऑनलाईन भेट झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. आरोपी भूषणने वाहन पाठवून तिला २३ एप्रिल रोजी मुक्ताईनगर येथे बोलावून घेतले. त्याच दिवशी त्याने तिच्यावर शारीरिक बळजबरी केली. तिला तेथीलच एका मंदिरात थांबविण्यात आले. दरम्यान, २४ एप्रिल रोजी भूषणचे कुटुंब त्या मंदिरात पोहोचले. त्यांनी पीडित व भूषणच्या लग्नाला विरोध केला.
अमरावती गाठले
लग्नास नकार मिळाल्याने त्याने तिला घेऊन तिचीच अमरावतीमधील भाड्याची खोली गाठली. ते येथील आदर्श नेहरूनगरात राहू लागले. तेथे एकत्र राहताना २४ एप्रिल ते ८ सप्टेंबरपर्यंत लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बळजबरी केली. लग्नाबाबत विचारणा केली असता, तो कागदपत्राचा बहाणा करत टाळत राहिला. दरम्यान तिला काहीही न सांगता तो ८ सप्टेंबर रोजी रात्री अमरावतीहून निघून गेला.
मारण्याची धमकी
ऑक्टोबरपर्यंत ते एकमेकांशी संपकार्त होते. त्यादरम्यान ती आरोपीला भेटण्यासाठी मुक्ताईनगर येथे गेली. तेथे भूषणचे वडील, आई व भावाने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली. तथा लग्न करून देण्यास नकार दिला. भूषण तायडे याने आपल्याला लग्नाचे आमिष दाखवून आपल्यावर वारंवार शारीरिक अत्याचार केल्याची तक्रार त्या तरूणीने १३ डिसेंबर रोजी सायंकाळी फ्रेजरपुरा पोलिसांत नोंदविली. पोलीस उपनिरिक्षक भारती मामनकर यांनी घटनास्थळी भेट दिली.