अमरावती : ब्रेनडेड अवस्थेतील मनोज गुप्ता यांचे यकृत व मूत्रपिंड बुधवारी सायंकाळी एअर अॅम्ब्युलन्सद्वारे मुंबईला पाठविण्यात आले, तर नेत्रदानानंतर नेत्रपटल सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. त्याकरिता विमानतळापर्यंत ‘ग्रीन कॉरिडॉर’ देण्यात आला होता. अमरावती शहरातून दुस-यांदा मानवी अवयवांची गरजू रुग्णांकरिता पाठवणी करण्यात आली आहे. मुंबई व नागपूर येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात अवयव दानासाठीची शस्त्रक्रिया पार पडली. हमालपुरा परिसरातील रहिवासी मनोज माणिकलाल गुप्ता (५२) यांची २३ आॅक्टोबर रोजी प्रकृती बिघडली. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना किडनी तज्ज्ञ अविनाश चौधरी यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ३१ आॅक्टोबर रोजी डॉक्टरांनी मनोज गुप्तांना बे्रनडेड घोषित केले. यानंतर त्यांचे अवयव दान करण्यासंदर्भात कुटुंबीयांनी सहमती दर्शविली. डॉ. चौधरी यांनी तात्काळ अवयवदानाशी संबंधित ‘झोनल आॅर्गन ट्रान्सप्लान्ट कमिटी’शी संपर्क साधून माहिती दिली. यासंबंधी प्रक्रिया करून बुधवारी अवयव मुंबर्ई येथे पाठविण्याची तयारी करण्यात आली. शस्त्रक्रियेसाठी मुंबई येथील डॉ. गौरव चौबे, नागपूरचे डॉ. सुशीलकुमार दुबे व अमरावती येथील डॉ. पिंकी थापर पोहोचल्या. डॉ. सोमनाथ चट्टोपाध्याय यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. अडीच तासांच्या शस्त्रक्रियेनंतर सायंकाळी ४.३० वाजता मनोज गुप्ता यांचे यकृत व मूत्रपिंड कार्डियाक अॅम्ब्युलन्सद्वारे बेलोरा विमानतळापर्यंत पाठविण्यात आले. यादरम्यान शहरातील रस्त्यांवर ‘ग्रीन कॉरिडॉर’ देण्यात आला होता. अमरावती शहर पोलिसांनी यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. विमानतळाहून एअर अॅम्ब्युलन्सद्वारे यकृत ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटल, तर मूत्रपिंड मुंबईतील डॉ. भरत शहा यांच्या ग्लोबल हॉस्पिटलला पाठविण्यात आले.
मनोज गुप्ता हे प्रापर्टी डीलर व लॉटरी व्यावसायिक होते. त्यांच्या पश्चात दोन मुली, मुलगा व भाऊ असा आप्तपरिवार आहे. ‘ग्रीन कॉरिडॉर’ची यशस्वी अंमलबजावणी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या उत्तम प्रशासन कौशल्यामुळे होऊ शकली. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी शहर हद्दीतील आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी ग्रामीण हद्दीतीली व्यवस्था चोख बजावली.
हृदयदान प्रक्रिया अडकलीमनोज गुप्ता यांचे हृदय चेन्नई येथे पाठविण्यात येणार होते. मात्र, मुंबईतील डॉक्टरांची चमू तेथील एअरपोर्टवरील अडचणींमुळे वेळेत अमरावतीत पोहोचू शकणार नव्हती. त्यामुळे डॉक्टरांची ती चमू अमरावतीत आलीच नाही. हृदयदान प्रक्रिया त्यामुळे होऊ शकली नाही. नेत्रपटल सुरक्षित मनोज गुप्ता यांचे नेत्रदानही करण्यात आले. सद्यस्थितीत नेत्रपटल डॉ. चौधरी यांच्या हॉस्पिटलमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. आवश्यकतेनुसार ते गरजू रुग्णाला लावले जाणार असल्याची माहिती चौधरी यांनी दिली.
अवयवदान हे समाजाच्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट निर्णय आहे. गुप्ता कुटुंबीयांनी समाजापुढे आदर्श प्रस्थापित केला आहे. - अविनाश चौधरी, किडनी तज्ज्ञ
समन्वयामुळे मिशन यशस्वीरीत्या पार पडले. शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतून रुग्णवाहिका जाणार होती. दोन्ही हद्दीत पोलीस प्रमुखांचे उत्तम सहकार्य लाभले. - अभिजित बांगर, जिल्हाधिकारी, अमरावती