अमरावती : शरीरातील एखादी विकृती दूर करण्यासाठी प्लास्टिक सर्जरी ही महत्त्वाची शस्त्रक्रिया ठरत असून, या शस्त्रक्रियेमुळे अनेक रुग्णांचे आयुष्य बदलले आहे. प्लास्टिक सर्जरीमध्ये शरीरातील विविध अवयव, त्वचा, हाडे, रक्तवाहिन्या, मज्जासंस्था व मज्जारज्जू यांना जोडण्याचे व त्यांचे पुनर्निर्माण करण्याचे कार्य प्रामुख्याने प्लास्टिक सर्जरी शस्त्रक्रियाद्वारे केली जाते. शहरातील विभागीय संदर्भ रुग्णालय (सुपर स्पेशालिटी) येथे वर्षभरात २६९० रुग्णांची प्लास्टिक सर्जरी झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
प्लास्टिक सर्जरी ही फक्त सुंदर दिसण्यासाठी केली जाणारी सर्जरी आहे, असा समज सर्वसामान्यांमध्ये आहे; परंतु ही शस्त्रक्रिया एखादे व्यंग दूर करून त्वचा पूर्ववत करण्यासाठी केली जाते. यामध्ये अपघातात तुटलेली नस, काही भागावरची निघालेली त्वचा, स्नायू तुटणे, जन्मजात असलेली विकृती, जळाल्यामुळे आलेली विकृती दूर करण्यासाठी, तसेच त्वचेचा कर्करोग, रक्तवाहिन्यांना जोडणे, स्तनांचे पुनर्निर्माण करणे, डायबेटिक फूट यावर प्लास्टिक सर्जरी केली जाते.
अपघातानंतर जर त्वरित उपचार मिळाले, तर स्नायू जोडले जाऊ शकतात. प्लास्टिक सर्जरी ही महागडी शस्त्रक्रिया आहे. पायाच्या नखापासून ते केसांपर्यंत शरीराच्या सगळ्याच अवयवांशी निगडित विकृतीवर उपचार म्हणून प्लास्टिक सर्जरी महत्त्वाची ठरत आहे. शहरातील विभागीय संदर्भ रुग्णालयामध्ये ही शस्त्रक्रिया मोफत होत असून, मागील वर्षभरात म्हणजेच १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीमध्ये २६९० रुग्णांची प्लास्टिक सर्जरी करण्यात आली आहे.
विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयामध्ये महिन्याला शेकडो रुग्णांची प्लास्टिक सर्जरी केली जाते. मागील वर्षभरात २६९० रुग्णांची यशस्वी प्लास्टिक सर्जरी केली आहे. या सर्जरीमुळे अनेक रुग्णांच्या आयुष्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल आले आहेत.
- डॉ. अमोल नरोटे, वैद्यकीय अधीक्षक, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल