आसेगाव पूर्णा (अमरावती) : चांदूर बाजार तालुक्यातील टाकरखेड पूर्णा येथील सहायक पशुधन विकास अधिकारी यांनी चक्क गोट पॉक्सची लस समजून कालवडांना दिली जाणारी ब्रुसेलिसिस नावाची लस चक्क मोठ्या जनावरांना टोचल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला.
आसेगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला सोमवारी पंचायत समितीमार्फत ब्रुसेलिसिस या लसीचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे लागण झालेल्या परिसरात सध्या या लम्पी आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी ‘गोट पॉक्स’चे लसीकरण केले जात आहे. आसेगाव पूर्णा येथील सहायक पशुधन अधिकारी डॉ. एस. आर. सातव यांनी दवाखान्यात प्राप्त झालेली लस गोट पॉक्स असल्याचे समजून कालवडांना दिली जाणारी ब्रुसेलिसिस नावाची लस मोठ्या जनावरांना टोचली.
जवळपास १५० मोठ्या जनावरांना ब्रुसेलिसिस लस टोचली आहे. विशेष म्हणजे ही लस ६ ते ९ महिन्यांपर्यंतच्या कालवडी गाभुळ नये याकरिता दिली जाते. परंतु, सहायक पशुधन अधिकाऱ्यांनी लम्पी आजारावरील लस असल्याचे समजून पशुधनाला लस टोचताच त्याची उलट लक्षणे होत असल्याचे पशुधन पालकांच्या लक्षात आले. त्यामुळे लम्पीच्या नावावर भलतीच लस सहायक पशुधन अधिकाऱ्याने टोचल्याचे लक्षात येताच एकच खळबळ उडाली.
पशुवैद्यकीय अधिकारी यांनी लम्पी आजाराच्या नावाखाली दिलेली लस ही ब्रुसेलिसिसची लस दिली आहे. ही लस दिल्यामुळे जनावरे चारापाणी खात नाही. या लसीमुळे गर्भधारण असलेली जनावरे उलटण्याची शक्यता आहे.
- अजय पाटील तायडे, पशुपालक टाकरखेडा पूर्णा
जनावरांना इतर रोग होऊ नये म्हणून एकटांग्या लसीकरण केले आहे. यामुळे जनावरांवर कोणताही वाईट परिणाम होत नाही.
- डॉ. एस. आर. सातव, पशुवैद्यकीय अधिकारी आसेगाव पूर्णा
डॉक्टरांनी गावात येऊन टोचलेली लस लम्पी या आजाराची नसून दुसरीच आहे. यामुळे जनावरांवर वाईट परिणाम होऊ लागले आहेत.
- गोलू रेखे, पशुपालक आसेगाव पूर्णा