अनिल कडू
अमरावती : देशातील पहिल्या नऊ व्याघ्र प्रकल्पांपैकी सर्वात मोठ्या आणि राज्यातील पहिल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने ४७ वर्षे पूर्ण केली असून ४८ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. २२ फेब्रुवारी १९७४ ला अस्तित्वात आलेला हा व्याघ्र प्रकल्प वाघांच्या प्रजननास व वास्तव्यास अनुकूल ठरला आहे. मेळघाटवाघांसह अन्य वन्यजिवांचा सर्वोत्कृष्ट नैसर्गिक अधिवास ठरला आहे.
व्याघ्र संवर्धनात स्थिरावलेल्या या व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रफळ २ हजार ७०० चौरस किलोमीटर आहे. यात ३६१.२८ चौरस किलोमीटरचे गुगामल राष्ट्रीय उद्यान समाविष्ट आहे. एका वाघाला साधारणतः २५ चौरस किलोमीटरचे क्षेत्र लागते. या अनुषंगाने मेळघाटात शंभराहून अधिक वाघ वास्तव्य करू शकतात. आज व्याघ्र प्रकल्पात ५० वाघ आहेत. यात २१ मादी आणि २९ नर आहेत.
याव्यतिरिक्त वाघांचे २२ छावे आहेत. नर मादी आणि छावे विचारात घेता आज मेळघाटात लहान मोठे ७२ वाघ वास्तव्यास आहेत. या ४७ वर्षांच्या प्रवासात मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील व्यवस्थापन आणि उपाययोजना टप्प्याटप्प्याने बदलत गेल्या आहेत. वाघ आणि वाघांचा नैसर्गिक अधिवास सुरक्षित ठेवण्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या परिणामकारक उपाययोजना राबविल्या जात आहेत. व्याघ्र संवर्धन व संरक्षणात व्याघ्र प्रकल्पाची यशस्वी घोडदौड सुरू आहे. एनटीसीच्या मूल्यमापन समितीच्या निष्कर्षात मेळघाट व्याघ्र प्रकल्प ‘व्हेरी गुड’ श्रेणीत आहे.
वाघांच्या अधिवासातील मानवी हस्तक्षेप कमी करण्याकरिता गावांच्या पुनर्वसनाची संकल्पना राबविल्या जात आहेत. पुनर्वसित गावात, गावठाण व शेत जमिनीवर गवती जंगल उभे होत आहे. यात हरणांची, सांबरांची व अन्य वन्यजिवांची संख्या वाढीस लागली आहे. यातून वाघांना खाद्यासह मानवविरहित क्षेत्र उपलब्ध होत आहे.