अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहाच्या बराक क्रमांक १२ मधून पाच दिवसांपूर्वी कुलूप तोडून पसार झालेल्या तीन कैद्यांचा अद्यापही शोध लागलेला नाही. तर दुसरीकडे या कैद्यांचे लोकेशन मिळत नसल्याने पोलीस प्रशासनसुद्धा हतबल झाले आहे. रत्नागिरी पोलीस प्रशासनाकडे ‘जेलब्रेक’ प्रकरणाची विशेष जबाबदारी सोपविल्याची माहिती आहे.
साहिल अजमत कालसेकर (३३, नायसी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी), सुमित शिवराम धुर्वे (१९) व रोशन गंगाराम उईके (२३, रा. बालापेठ, शेंदुरजनाघाट, ता. वरूड, जि. अमरावती) अशी पसार कैद्यांची नावे आहेत. या तीनही कैद्यांनी बराकीचे कुलूप सिनेस्टाईल तोडून ‘जेलब्रेक’ केले. याप्रकरणी कारागृह प्रशासनाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या आदेशानुसार चंद्रपूर जिल्हा कारागृहाचे अधीक्षक वैभव आगे हे चौकशी करीत आहेत.
रविवारी चौथ्या दिवशीसुद्धा कारागृह प्रशासनाच्या चौकशी पथकाला ठोस काही हाती लागले नाही. अधिकारी, कर्मचारी आणि काही कैद्यांचे बयाण नोंदविण्यात आले आहे. मात्र, फ्रेजरपुरा पोलिसांनादेखील पसार कैद्यांची काहीही माहिती मिळू शकलेली नाही. पोलीस गुन्हे शाखा, शेंदुरजनाघाट, रत्नागिरी पोलीस कसून शोध घेत आहे. ‘जेलब्रेक’ प्रकरणाचा मास्टर माईंड साहिल अजमत कालसेकर हा मूळ रत्नागिरी जिल्ह्यातील आहे. साहिल याची हिस्ट्री गुन्हेगारीची असल्याने रत्नागिरी पोलिसांकडे शोधमाेहिमेची जबाबदारी साेपविण्यात आली आहे. कारागृह चौकशी अहवाल सोमवारी डीआयजी स्वाती साठे यांना सोपविला जाणार आहे.
तांत्रिक बाबींच्या तपासाकडे लक्ष
जेलब्रेकप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास तांत्रिकदृष्टीने केला जात आहे. तीनही पसार आरोपींचे आप्त, नातेवाईक, मित्रांचा सुगावा घेण्यात येत आहे. पोलीस आयुक्तालयाचे गुन्हे शाखा, शेंदुरजनाघाट, रत्नागिरी पोलीस त्या दिशेने तपास करीत आहे. तांत्रिक तपासानुसारच पसार कैद्यांचा शोध घेता येईल, असे फ्रेजरपुरा पोलीस निरीक्षक अनिल कुरळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
पोलिसांचे चार पथक गठित
येथील मध्यवर्ती कारागृहातून २८ जून रोजीच्या पहाटे १.३० ते २ वाजेदरम्यान ‘जेलब्रेक’ करणाऱ्या तीनही पसार कैद्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी चार पथके गठित केल्याची माहिती आहे. या पथकांतील पोलीस पसार कैद्यांचे नातेवाईक, मित्रांची यादी गोळा करीत आहेत. कैदी पसार झाल्यानंतर परराज्यात गेल्याबाबतचा संशय पोलिसांना आहे. त्याअनुषंगाने तपासाला गती मिळेल, असे सूत्रांनी सांगितले.