जिल्हाभरातील गोरगरिबांना मोफत धान्याची अजूनही प्रतीक्षाच
अमरावती : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील गरीब जनतेसाठी मोफत धान्य योजना जाहीर केली आहे. मात्र, जिल्ह्यात अजून या योजनेचा लाभ मिळालेला नाही. गरिबांना मोफत धान्य हे मे महिन्यात मिळणार असल्याची माहिती समाेर आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गोरगरीब जनतेला अजूनही या योजनेतून धान्य मिळण्याची प्रतीक्षाच आहे.
गरीब कल्याण योजना लाॅकडाऊनच्या काळात जाहीर केली. या योजनेत अंत्योदय आणि प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना मोफत धान्य देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्यापाठोपाठ प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनांतर्गत मे आणि जून महिन्यात धान्य वितरित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे स्वस्त धान्य दुकानातून प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री योजनेतून मोफत धान्य एकाच वेळी उपलब्ध होणार आहे.
मुख्यमंत्री योजनेतील मोफत धान्य वितरणाचे आदेश एप्रिलमध्ये काढण्यात आले. तोपर्यंत बहुतांश लाभार्थींनी धान्याची उचल केली होती. यामुळे या योजनेचा लाभ देण्यासाठी मे महिन्यात लाभार्थ्यांना धान्य वितरित करण्यात येणार आहे. यासोबतच मे आणि जून महिन्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना प्रत्येकी पाच किलो मोफत धान्य दिले जाणार आहे. सध्या कोरोनाचा वाढता सहभाग लक्षात घेता. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून रेशन कार्डधारकांना मोफत धान्य देण्याची घोषणा शासनाने केली आहे. त्यानुसार पुरवठा विभागाने नियोजन करून मोफत धान्यासाठीची मागणी शासनाकडे नोंदवून यातील काही साठा उपलब्ध झाला आहे. त्यानुसार येत्या मे महिन्यापासून मोफत धान्याची वितरणाची कारवाई सुरू केली जाणार आहे.
बॉक्स
कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा
कोट
लॉकडाऊनमुळे हाताला काम नाही. मजुरीही बंद आहे. यामुळे जे काम उपलब्ध होईल, त्यावर गुजराण करावी लागत आहे. स्वस्त धान्य दुकानांमध्ये मोफत धान्य एप्रिल महिन्यात उपलब्ध झाले नाही. पुढील महिन्यात ते उपलब्ध होणार आहे. किमान मिळणाऱ्या धान्यामुळे दिलासा मिळेल.
- सहदेवराव मेश्राम,
लाभार्थी
कोट
एप्रिलचा मोफत स्वस्त धान्य योजनेचा लाभ अजून मिळालेला नाही. रेशन दुकानात देखील त्याबद्दल विचारणा केली. मात्र, या योजनेचा लाभ पुढील महिन्यात मिळू शकेल असे सांगितले जात आहे. या अडचणीच्या काळात अद्याप मोफत धान्य मिळाले नाही. ते लवकारात लवकर द्यावे.
- आशिष मानकर,
लाभार्थी
कोट
कोरोनाचा वाढता संसर्गामुळे सरकारने मोफत धान्य देण्याची घोषणा केली. मात्र, एप्रिल महिना संपूनही धान्य मिळाले नाही. मे महिन्यात मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु नेमके कधी मिळणार, हे अस्पष्ट आहे. लवकर योजनेचा लाभ गोरगरिबांना द्यावा.
- जयकृष्ण सहारे,
लाभार्थी
कोट
रेशन दुकानांमधून प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री गरीब कल्याण योजनातून मोफत धान्य दिले जाणार आहे. यामध्ये गहू आणि तांदळाचा समावेश आहे. मे आणि जून महिन्यात हे धान्य वाटप शासनाच्या सूचनेप्रमाणे केले जाईल.
- अनिल टाकसाळे,
जिल्हा पुरवठा अधिकारी
बॉक्स
एकूण रेशन कार्ड धारक
४०७६२६
रेशन कार्डचा प्रकार रेशन कार्डची संख्या
अंत्योदय -१२२८४४
प्राधान्य गट - २८५७८२
केसरी -८००२८
बॉक्स
गहू आणि तांदूळ
गरीब कल्याण योजना बद्दल लाभार्थींना प्रत्येकी पाच किलो मोफत धान्य वितरित करण्यात येणार आहे. यामध्ये गहू आणि तांदळाचा प्राधान्याने समावेश राहणार आहे.