फोटो -
कंटेन्मेंट झोन घोषित : दुपारी ३ नंतर शहराती रस्त्यांवर शुकशुकाट, पोलिसांचा बंदोबस्त
भातकुली : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी भातकुली नगरपंचायत क्षेत्रात २२ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकार लॉकडाऊन या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. शहरवासीयांना त्रिसूत्रीची अंमलबजावणी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
अमरावती शहरालगत असलेल्या भातकुली नगरपंचायत क्षेत्रात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी कंटेन्मेंट झोन घोषित केल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानाशिवाय इतर सर्व दुकाने बंद आहेत. उघड्या दुकानांवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. यादरम्यान २३ फेब्रुवारीला एका दुकानावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. १ मार्चच्या सकाळी ६ वाजेपर्यंत भातकुली शहरात लॉकडाऊन राहणार आहे.
बंद दरम्यान किराणा, औषधी, स्वस्त धान्य दुकान, फळ व भाजीपाला दुकानांसह दवाखाने, दूध डेअरी, पेट्रोल पंप, वीज सेवा, पाणी पुरवठा, नाल्या सफाईची कामे सुरू आहेत. ठाणेदार विजयकुमार वाकसे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील मुख्य चौकात पोलिसांचा कडक पहारा आहे. बसस्थानकावर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी होत आहे. मंगळवारी भातकुली शहरात पेट्रोलिंग करीत नागरिकांना एकत्रित येण्यास पोलिसांनी मज्जाव घातला.
--------------
बँका सुरू, मंदिरे बंद
भातकुलीतील सर्वच राष्ट्रीयीकृत व सहकारी बँका सुरू आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांची गर्दी तेथे होत आहे. पण, सॅनिटायझरसह मास्क लावून सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन होत आहे. दुपारी ३ नंतर बसस्थानक, ग्रामीण रुग्णालय परिसर, वाल्मीकी चौक, न्यायालय व नगरपंचायत परिसर, शिवाजी चौक व आठवडी बाजार परिसर, गुरुदेव चौक निर्मनुष्य होतो. मालवाहतूक तेवढी सुरू असते. आदिनाथ स्वामींच्या जैन मंदिरांसह शहरातील सर्वच मंदिरे बंद करण्यात आली आहेत.
---------------
शुक्रवारी बाजार नाही...
भातकुली येथील दर शुक्रवारी होणारा आठवडी बाजार १९ फेब्रुवारी रोजी भरला नव्हता. त्याऐवजी चौकात भाजीपाला विक्रीची दुकाने थाटली होती. आता शहर कंटेन्मेंट झोनमध्ये आल्याने आगामी आठवडी बाजार भरणार नाही, अशी माहिती नगरपंचायत प्रशासनाने दिली.