मोर्शी : सततचा लॉकडाऊन व कडक निर्बंधामुळे शेतात मजूर कामाला येत नाही. त्यामुळे माल काढता येत नाही. काढला तर तो विक्रीसाठी बाजारात नेण्यासाठी वाहन नाही. आणि बाजारात तो माल नेलाच तर विकला जाईल, याची कोणतीही हमी नाही. यामुळे शेतकऱ्यांना हा माल आपल्या डोळ्यांदेखत शेतात तसाच सोडून द्यावा लागत आहे, अशी ग्रामीण भागातील बळीराजाची अवस्था झाली आहे.
लॉकडाऊनमुळे शेतकरी व शेती उद्योग मोठ्या अडचणीत सापडला आहे. शेतकरी वर्षभराचे नियोजन करून पीकलागवड करत असतो. खरिपात झालेला अतिपाऊस व त्यामुळे मका, कपाशी यासारख्या पिकांवर आलेले रोग, घटलेले उत्पादन, पडलेले बाजारभाव यामुळे खरिपात शेतकऱ्यांच्या हाताला फार काही लागले नाही. परिणामी संत्रा, मोसंबी, कपाशी, मका, सोयाबीन यासारखी पिके लवकर काढून शेतकऱ्यांनी रबीसाठी आपले रान लवकर मोकळे केले. कमी कालावधीचे पीक घेऊन दोन पैसे हातात येतील या एकाच आशेवर कर्जबाजारी होऊन गहू, कांदे, टोमॅटो, टरबूज, खरबूज, कोहळे, काकडी, कोथिंबीर, भाजीपाला अशी पिके शेतकऱ्यांनी लावली होती. मात्र, गहू व कांदा सोडला तर बाकी पिके ही रोजच्या रोज काढून बाजारात विक्रीसाठी न्यावी लागतात, अन्यथा ती खराब होतात.
साधारणपणे मार्चपासून टरबूज बाजारात येतात. मात्र, ऐन टरबूज काढण्याच्या वेळीच शासनाकडून लाॅकडाऊनची घोषणा करण्यात आली व जिल्हा प्रशासनाकडून कडक निर्बंध लावण्यात आले. त्यामुळे व्यापारी माल घेत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा हा माल शेतातच सडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल विक्रीअभावी फेकून द्यावा लागत आहे. पारंपरिक शेतीला फाटा देत शेतकऱ्यांनी फळबाग करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार ओलित व ठिंबक सिंचनाद्वारे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी टरबूज, खरबूज व कोहळ्यासारख्या फळभाज्यांची लागवड केली.
कोहळे बेभाव
अक्षय तृतीयाच्या सणाला कोहळ्याला विशेष महत्त्व असते. यावेळी कोहळ्याला बऱ्यापैकी भाव असतो. मात्र, याच पर्वावर लागलेल्या संचारबंदीमुळे फळ,भाजीपाला फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. काकडी, टोमॅटोे, वांगी भाजीपाला याही पिकांची दैनावस्था आहे. लग्नाचा सिजन डोळ्यासमोर ठेवून मोठ्या आशेने लावलेली फुलवलेली ही पिके सोडून देताना शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांद्याचे पीक शेतात तयार आहे. पण बाजारात पाहिजे तसा भाव नाही. ग्राहक नाही ही मोठी शोकांतिका आहे.
बॉक्स १
गहू निघाला पण भाव नाही
गहू शेतकऱ्यांनी गव्हाची सवंगणी केली. पण यंदा लॉकडाऊनमुळे वाहवतूक सेवा बंद असल्याने इतरत्र नेण्यास अडचणी येत आहे. परिणामी गव्हाला भाव नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. लॉकडाऊनचे संकट डोक्यावर असताना अवकाळी पावसाने अधिकच चिंतेच भर टाकली. ज्या गव्हाला किमान दोन हजार ते २२०० रुपये क्विंटल भाव अपेक्षित होता तिथे आज १५०० रुपयांनी मागितला जात आहे.
खाद्यतेल महागलेलेच
याउलट परिस्थिती किराणा मालाची आहे. जो माल शेतकऱ्यांकडून घेऊन व्यापारी व दलालांनी गोदामे भरून ठेवली आहेत. त्या मालाचे म्हणजे शेंगदाणे, खाद्यतेलाचे दर लॉकडाउनमध्ये सतत वाढतच आहेत. लॉकडाउनची परिस्थिती अजून अशीच कायम राहिली तर शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढत जातील. गरिबांच्या जेवणातील सोयाबीन तेल १७५ रुपये लिटरवर पोहोचले आहे.