अमरावती : राज्यभरात कोरोना संकटामुळे हाहाकार माजला आहे. यामुळे सर्व क्षेत्रातील अर्थव्यवस्था खिळखिळी झाली असून, अनेक क्षेत्रातील नागरिक तणावाखाली जगत आहेत. गत वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचे आगमन झाले. तेव्हापासून आतापर्यंत दीड वर्षात आर्थिक घडी पूर्णत: विस्कटली आहे.
ग्रामीण भागातील सुतार काम करणारे, वेल्डिंग व इतर मजुरीची कामे करणारे, म्हणजेच लोहारकाम, टेलर, वेल्डिंग, मोटार गॅरेज, कापड दुकानातील कामगार, चहा टपरी चालक, नास्ता विक्री करणारे, मडकी घडवणारे कुंभार बांधव, मंडप व्यवसाय, आचारी, सलूनचे काम करणारे, बाजारात जाऊन खेळणी, स्टेशनरी विकणारे, मेवामिठाई विकणारे असे प्रत्येक व्यवसाय पूर्णपणे बंद पडले आहेत. त्यामुळे अक्षरश: या छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. फक्त अत्यावश्यक सेवेत असणारी दुकाने किमान ठराविक वेळेत तरी उघडली जातात. त्यामुळे त्यांना उपजीविकेला काही अडचण येत नाही. पण जे व्यवसाय आठवडी बाजार किंवा यात्रावर अवलंबून आहेत. त्यांना मात्र जगणे मुश्कील झाले आहे. कोरोनाच्या काळात मोठ्या विवाह समारंभावर मनाई आहे. यामुळे यावर आधारित उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामीण भागात असे अनेक छोटे व्यवसाय कोरोना, लॉकडाऊनमुळे ही बंद आहे. अशा लोकांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे. अशा व्यावसायिकांना खरे तर शासनाने मदत करणे आवश्यक आहे. पण शासनाने याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. फक्त बांधकाम कामगार व पीएमकिसानचे पैसे खात्यावर जमा झाले आहेत. बाकी सर्वांना अडचणी निर्माण झाले आहेत.
बॉक्स
छोटे व्यावसायिक हतबल
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून लॉकडाउन करण्यात आला आहे. यामुळे यात्रा, आठवडी बाजार बंद असल्याने छोटे व्यावसायिक अक्षरश: हतबल झाले आहेत. शेतकऱ्यांना आपल्या पिकवलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध होत नाही. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.