अमरावती : लॉकडाऊन घोषित होताच शहरातील मुख्य चौकासह एकूण ४५ ठिकाणी फिक्स पॉईंट निश्चित केले आहे. लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सुविधा वगळता विनाकारण बाहेर पडणे महागात पडणार आहे. कोरोनाला थांबविण्याकरिता नियमांचे पालन करा, अन्यथा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारा, असे निर्देश पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी संबंधित ठाणेदारांना व पोलीस यंत्रणेला दिले आहे. १४ एप्रिलच्या रात्री ८ वाजतापासून, तर ३० एप्रिलच्या रात्री २३.५७ वाजेपर्यंत शासानाने संचारबंदी घोषित केली आहे. त्याअनुषंगाने अमरावती शहरात प्रवेश करण्याच्या मार्गावर नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच आरसीपी, क्युआरटी पथकाची सतत गस्त राहणार आहे. पोलीस स्टेशन स्तरावर पोलीस निरीक्षक, त्यांच्या अधिनस्त अधिकारी, सीआर मोबाईल, बिट मार्शल, दामिनी पथक व वाहतूक शाखेचे पथक कारवाईसाठी रस्त्यावर उतरणार आहेत. प्रत्येक वाहनचालकांची कसून चौकशी करण्यात येणार आहे.
संचारबंदी दरम्यान पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात दोन पोलीस उपायुक्त, दोन सहायक पोलीस आयुक्त, ६७ पोलीस अधिकारी, १४२० पोलीस कर्मचारी व २५० होमगार्ड तैनात राहणार आहेत.
कोट
अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, अन्यथा संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर भादंविचे कलम १८८ प्रमाणे कारवाई करावी लागले. नागरिकांनी शासानाच्या आदेशाचे पालन करावे, तसेच शासनाचे नियम पाळून सहकार्य करावे.
- आरती सिंह, पोलीस आयुक्त, अमरावती