अमरावती :अमरावती जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला असताना गेल्या अनेक वर्षांपासून येथे काँग्रेसला लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही, परिणामत: बळजबरीने आमच्यावर उमेदवार लादला जातो आणि त्याला निवडून आणावे लागते. परंतु यामुळे पक्षाचे खच्चीकरण होत आहे. जिल्हा कॉंग्रेसचा हा बालेकिल्ला कायम ठेवायचा असेल तर आता काँग्रेसचाच खासदार हवा, असा एकमुखी सूर पक्ष निरीक्षकांच्या बैठकीत उमटला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष निरीक्षक आ. रणजित कांबळे व समन्वयक किशोर गजबिये यांनी रविवारी अचलपूर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या बैठकीला माजी मंत्री आ. यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत अचलपूर मतदारसंघाची ही बैठक पार पडली.
अमरावतीमध्ये ग्रामीण भागात जिल्हा परिषद पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, बहुतांश ग्रामपंचायतवर काँग्रेसचे वर्चस्व आहे. त्यामुळे लोकसभेकरिता काँग्रेसला अनुकूल वातावरण असतानादेखील आतापर्यंत अमरावती लोकसभेमध्ये इतर पक्षांचा उमेदवार निवडून आला आहे. त्यामुळे आता लोकसभेची उमेदवारी पंजा या चिन्हावर लढवावी, अशा भावना कार्यकर्त्यांनी निरीक्षकांशी संवाद साधताना व्यक्त केल्या. कोणत्याही पक्षाच्या युतीमध्ये अमरावती लोकसभेची उमेदवारी ही काँग्रेसलाच गेली पाहिजे, असा आग्रही कार्यकर्त्यांनी रेटून धरला. आता सॅक्रिफाइस आम्ही करणार नाही. इतर कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला आम्ही स्वीकारणार नाही, अशी आग्रही भूमिका कार्यकर्त्यांची दिसून आली.
या बैठकीला राजेंद्र गोरले, दयाराम काळे, गिरीश कराळे, बाबूराव गावंडे, श्रीधर काळे, डॉ.रवींद्र वाघमारे, शिवाजीराव बंड, किशोर देशमुख, श्रीकांत झोडपे, नामदेव तनपुरे, महेरुल्ला खान, राजा टवलारकर, देवेंद्र पेटकर, साजिद फुलारी, सहदेव बेलकर, राहुल येवले, पंकज मोरे, अजीज खान, सचिदानंद बेलसरे आदींची उपस्थिती होती.
आतापर्यंत दुसऱ्या पक्षाचे उमेदवार देखील आम्ही पचविले आहे. परंतु आता खूप झाले. काँग्रेस पक्ष मजबूत करण्याकरिता आणि तो जिल्ह्यात कायम ठेवण्याकरिता आता आम्हाला स्थानिक आणि काँग्रेसचा सक्षम कार्यकर्ताच उमेदवार हवा.
- माजी मंत्री तथा आमदार यशोमती ठाकूर
जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांना काँग्रेसची पकड मजबूत आहे. काँग्रेसचे खासदारकीसाठी वातावरण अनुकूल आहे, त्यामुळे यावेळी पक्षश्रेष्ठीने विचार करून काँग्रेसचा उमेदवार लोकसभेसाठी द्यावा, तो निवडून आणण्याची सर्वस्वी जबाबदारी आमची आहे आणि निवडून आणू.
- बबलू देशमुख जिल्हाध्यक्ष