अमरावती - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात अमरावती विभागातील अमरावती, अकोला आणि बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी १८ एप्रिल रोजी मतदान पार पडले. यामध्ये तीन लोकसभा मतदारसंघात ५४ लाख ५१ हजार मतदारांपैकी सुमारे ३३ लाख ३९ हजार मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. विभागाची मतदानाची टक्केवारी ६१.२५ आहे.
अमरावती मतदारसंघातील एकूण १८ लाख ३० हजार ५६१ मतदारांपैकी ११ लाख चार हजार ९३६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात पाच लाख दोन हजार ९२१ महिला, सहा लाख दोन हजार आठ पुरूष, तर सात इतर मतदारांचा समावेश आहे. अमरावती मतदारसंघाची टक्केवारी ६०.३६ राहिली. अकोला मतदारसंघातील एकूण १८ लाख ६१ हजार ७५९ मतदारांपैकी ११ लाख १६ हजार ७६३ मतदारांनी मतदान केले. यात पाच लाख नऊ हजार ८३४ महिला, सहा लाख सहा हजार ९२२ पुरूष, तर सात इतर मतदार आहेत. अकोला मतदारसंघाची मतदान टक्केवारी ५९.९८ एवढी आहे. बुलडाणा मतदारसंघातील एकूण १७ लाख ५८ हजार ९४३ मतदारांपैकी ११ लाख १७ हजार ४८६ मतदारांनी मतदान केले. यात पाच लाख १६ हजार ७०३ महिला, सहा लाख ७८२ पुरूष, तर एका इतर मतदारांनी मतदान केले. बुलडाणा मतदारसंघाची मतदानाची टक्केवारी सर्वाधिक ६३.५३ एवढी आहे. विभागातील ३३ लाख ३९ हजार १८५ एकूण मतदारांपैकी १५ लाख २९ हजार ४५८ महिला, १८ लाख नऊ हजार ७१२ पुरूष तर १५ इतर मतदारांनी मतदान केले.लग्न तिथी अन् उन्हाचा मतदानाला फटका
१८ एप्रिल या तारखेला लग्न सोहळ्याची मोठी तिथी होती. त्यातच दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची तारीख निश्चित झाल्याने बहुतांश मतदार मंगल कार्यालयात लग्नसोहळ्याकरिता गेले होते. त्याचा परिणाम मतदानावर झाला. मतदान पार्टीसाठी व लग्न सोहळ्यासाठी बसेस बुक असल्याने वाहतुकीला साधने कमी होती. त्याचप्रमाणे या दिवशीचे तापमानदेखील ४२ अंशांवर होते. त्यामुळे सकाळी व दुपारनंतर केंद्रावर गर्दी झाली. दुपारी मतदान कमी झाले. याचाही परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर झाल्याचे दिसून आले.