लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकसभा निवडणुकीची प्रचारधुमाळी आरंभ होताच विदर्भात उष्णतेची लाट आल्याने पारा ४२ अंशांवर गेला आहे. प्रचारात सहभागी झालेल्या नेत्यांना भर उन्हात फिरणे तापदायक ठरू लागले आहे.लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली. १० मार्च रोजी आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने आपल्याकडून उल्लंघन होऊ नये, याची काळजी उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी घेतली. २९ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज भरणे व माघारीची प्रक्रिया पार पडली. चिन्हवाटपानंतर खुल्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. मात्र, पाच दिवसांपासून विदर्भात चक्रावात आल्याने उष्णतेची लाट पसरली आहे. परिणामी मतदारांच्या घरापर्यंत जाऊन त्याच्याशी संपर्क करण्यात उन्हाची अडचण उभी ठाकली आहे. भरदुपारी घराबाहेर पडल्यास अंगाची लाहीलाही होत आहे. झाडाच्या सावलीतही उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. वाढत्या उन्हामुळे मतदारराजा थंडगार हवेत सुखावलेला असतो. या मतदारराजाला भरदुपारी जागे करण्यासाठी नेते व कार्यकर्ते पुढाकार घेत नाहीत.ही स्थिती टाळण्यासाठी सकाळी व दुपारी ४ वाजतानंतर वाहनांद्वारे प्रचारावर भर दिला जात आहे. निवडणूक आयोगाने रात्री १० वाजेपर्यंत प्रचाराची मर्यादा आखून दिल्यामुळे भर उन्हात प्रचार करावा लागत आहे. याचा फटका नेत्यांसह कार्यकर्त्यांना सहन करावा लागत आहे.
घरोघरी जाऊन प्रचाराची मानसिकता नाहीवाढत्या उन्हामुळे घरोघरी जाऊन प्रचार करण्याची मानसिकता कार्यकर्त्यांचीही नसल्याचे दिसून येत आहे. उन्हात प्रचार करणे सर्वांसाठी डोकेदुखी ठरत आहे. आणखी काही दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यासह श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे हवामानशास्त्र विभागप्रमुख अनिल बंड यांनी वर्तविला आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्य सांभाळण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.