अजित पवार, सुनेत्रा पवार हे सप्लिमेंट्री; संजय राऊत यांची बोचरी टीका
By गणेश वासनिक | Published: April 18, 2024 06:21 PM2024-04-18T18:21:40+5:302024-04-18T18:22:17+5:30
बारामतीवर नेहमीच शरद पवारांचा प्रभाव; अमरावती येथे महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारानिमित्त पत्रपरिषद
अमरावती : बारामती मतदारसंघातून आतापर्यंत सुप्रिया सुळे यांनी ज्या निवडणुका लढविल्या त्यापेक्षा यंदा विक्रमी मतांनी निवडून येतील. बारामती मतदारसंघावर नेहमी शरद पवार यांचा प्रभाव राहिला आहे. अजित पवार, सुनेत्रा पवार आणि अन्य कोणी असतील ते सप्लिमेंट्री आहेत. शरद पवार आहेत म्हणून ते आहेत, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली आहे. त्यामुळे पुन्हा नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे नेते संजय राऊत हे दोन दिवसीय अमरावती दौऱ्यावर होते. गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याविरोधात एक मोठे वक्तव्य केले आहे. बारामती मतदारसंघातून आतापर्यंत सुप्रिया सुळे यांनी ज्या निवडणुका लढल्या, त्यापेक्षा विक्रमी मतांनी निवडून येतील. बारामतीत शिवसेना, काँग्रेस अन्य मित्र पक्ष सुप्रिया सुळे यांच्या विजयासाठी जिवाचे रान करतील, असे ते म्हणाले.
जेव्हा-जेव्हा महाराष्ट्रावर राजकीय संकट आले तेव्हा-तेव्हा विदर्भात चमत्कार झाला आहे. त्यामुळे यंदा विदर्भात सर्वाधिक, तर राज्यात महाविकास आघाडी ३५ जागा जिंकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसेना ही ठाकरेंची आहे आणि त्यांचीच राहील, तर ‘वंचित’च्या प्रकाश आंबेडकरांसोबत मैत्री कायम असल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला. पत्रपरिषदेला माजी मंत्री तथा आमदार यशोमती ठाकूर, आमदार बळवंत वानखडे, माजी खासदार अनंत गुढे, शिवसेना संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी आदी उपस्थित होते.