लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अमरावती लोकसभेची निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. समोरील उमेदवार कोट्यधीश आहे. मात्र, सामान्य माणूस जेव्हा पेटून उठतो तेव्हा ती ज्वाला होते. त्यामुळे पुढील २० दिवस झोपू नका, विरोधकांची झोप उडवा, असे भावनिक आवाहन 'प्रहार जनशक्ती पार्टी'चे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी बुधवारी कार्यकर्त्यांना केले.
अमरावती लोकसभा मतदारसंघात 'प्रहार'चे उमेदवार दिनेश बूब यांनी नामांकन दाखल केले. यावेळी आयोजित प्रचार सभेला ते संबोधित करीत होते. यावेळी मंचावर आमदार राजकुमार पटेल, अॅड. आर. बी. अटल, चांदूर बाजारचे माजी नगराध्यक्ष अब्दुल रहेमान, बल्लू जवंजाळ, बंटी रामटेके, वसू महाराज आदी पदाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अतिशय जवळीक असणारे आमदार श्रीकांत भारतीय यांचे आई- वडील घरात एकटेच असताना त्यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. आपल्या माणसांच्या घरावर हल्ला करणाऱ्यांना 'भाजप'ने उमेदवारी देणे योग्य नाही. जिल्ह्यात भाजपच्या पालकमंत्र्याला 'बालक मंत्री' म्हणणारे आणि त्यांना बांगड्या देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे, हा सारा प्रकार अतिशय दुर्दैवी असून या अशा प्रवृत्तींपेक्षा एखादा सामान्य कार्यकर्ता जरी उभा केला असता तरी आम्ही भाजपसोबत असतो, असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.
संपूर्ण देशात दमदाटीचे राजकारण सुरू आहे. असे असताना अमरावतीत आम्ही कोटींची संपत्ती असणाऱ्यांसोबत लढा देत आहोत. आमची ही लढाई सोपी नाही. सत्ताधारी कदाचित उद्या आम्हाला जेलची पायरी चढायला लावतील, असेही ते म्हणाले. नवनीत राणा यांचे जातीचे प्रमाणपत्र खोटे आहे, हे उच्च न्यायालयात स्पष्ट झाले आहे. असे असताना भाजपने त्यांचा उमेदवारी दिली, ही बाब दुर्दैवी आहे. असे असले तरी आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ, तेथे योग्य न्याय केला जाईल, असे बच्चू कडू जाहीर सभेत म्हणाले.
'प्रहार'चे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारासाठी नेहरू मैदान येथील जाहीर सभेनंतर अमरावती शहरातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले.
देशाला हिंदुत्व सांगणाऱ्यांच्या घरासमोर हनुमान चालिसा!
संपूर्ण भारताला खऱ्या अथनि हिंदुत्व काय आहे, याची शिकवण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली, असे असताना राणा दाम्पत्यांनी थेट 'मातोश्री' समोर हनुमान चालिसा पठण करण्याचा दुर्दैवी हट्ट धरला. खरंतर आम्हीसुद्धा हनुमान चालिसा पठण करतो, आम्हीदेखील धार्मिक आहोत; मात्र आपला धर्म हा घरात पाळण्यासाठी आहे. आम्ही ज्यावेळी घराच्या बाहेर पडतो तेव्हा भारतीय असतो, याचे भान सर्वांनी राखण्याची गरज असल्याचे देखील कडू म्हणाले.