Lok Sabha Election 2024 ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या प्रचारसभा सुरू आहेत. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अमरावती दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी जाहीर सभेला संबोधित केले. दरम्यान, केंद्रीय अमित शाह यांनी खासदार शरद पवार यांच्यावर टीका केली.
दोन दिवसापूर्वी खासदार शरद पवार यांनी अमरावतीमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी मागील लोकसभा निवडणुकीवेळी नवनीत राणा यांना पाठिंबा दिला ही चूक झाली सांगत जाहीर सभेत लोकांची माफी मागितली होती. यावरुन आता केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर पटलवार केला आहे.
"पवार साहेब तुम्ही एवढ्या वर्षे कृषीमंत्री होता, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही होता, विदर्भात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तुम्ही शेतकऱ्यांसाठी सिंचनाचे कोणतेच काम केले नाही. माफी मागायची असेल तर विदर्भातील पीडित शेतकऱ्यांची माफी मागा, असा पलटवार अमित शाह यांनी शरद पवारांवर केला.
"भाजपा -शिवसेना सरकारने विदर्भात सिंचनासाठी मोठी काम केले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवीन योजना सुरू केल्या, यामुळे तीन लाख हेक्टर क्षेत्रावर पाणी मिळाले आहे, असंही अमित शाह म्हणाले.
अमित शहांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
"हे स्वत:ला शिवसेनेचे अध्यक्ष मानणाऱ्या उद्धव ठाकरे यांना अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण दिले. पण, हे नकली शिवसेनेचे अध्यक्ष सोनिया गांधींच्या भीतीने प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गेले नाहीत, अशी टीका केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. यावेळी अमित शाह यांनी खासदार शरद पवार यांच्यावरही जोरदार टीका केली. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण शरद पवार यांनाही दिले होते, पण त्यांनी तब्येतीचे कारण सांगत आले नाहीत. पण आता शरद पवार निवडणुकीच्या प्रचारात फिरत आहेत, असंही अमित शाह म्हणाले.