अमरावती - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाकडून उमेदवार जाहीर करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. 11 एप्रिलला होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील मतदारसंघातील उमेदवार यादी जाहीर होऊ लागली आहे. यात अमरावती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीकडून आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आलीय.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत युवा स्वाभिमानचे आमदार रवी राणा सहभागी झाले आहेत, रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला राष्ट्रवादीकडील अमरावतीची जागा सोडण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतला आहे. अमरावतीतील लोकसभा मतदारसंघातील जागेवर रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा निवडणूक लढवणार आहेत. युवा स्वाभिमान पक्षाच्या चिन्हावर अमरावती लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे रवी राणा यांनी सांगितलं.
मागील 2014 लोकसभा निवडणुकीप्रमाणे यंदाही अमरावती लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आनंदराव अडसूळ आणि आघाडीच्या नवनीत राणा यांचा सामना रंगणार आहे. गेल्या वर्षी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार असणाऱ्या नवनीत राणा यांना युवास्वाभिमान पक्षाचा पाठिंबा होता. यावेळी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या युवास्वाभिमान पक्षाला पाठिंबा द्यावा, अशी विनंती शरद पवार आणि अजित पवार यांना केली होती.आमची विनंती शरद पवारांनी मान्य केली असून येत्या ३ -४ दिवसात आघाडीची उमेदवार म्हणून माझे नाव जाहीर होईल, असं नवनीत राणा यांनी सांगितले आहे.
नवनीत राणा कोणत्या पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र युवा स्वाभिमान पक्षाकडूनच ही निवडणूक लढणार असल्याचे रवी राणा यांनी स्पष्ट केलं. अनेक दिवसांपासून रवी राणा यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक होती. मात्र शिवसेना-भाजप युती जाहीर झाल्यामुळे अमरावती लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेच्या वाट्याला आहे. त्यामुळे भाजपची फारकत घेत रवी राणा पुन्हा आघाडीत आले आहेत. या मतदारसंघासाठी अनेक दिवसांपासून नवनीत राणा यांनी तयारी सुरु केली होती. मतदारसंघात ठिकठिकाणी महिला मेळावे, कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन नवनीत राणा यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. सोशल मिडीयामध्ये नवनीत राणा यांचे कार्यकर्ते "जनतेशी आघाडी माझी, जनतेशी माझी युती, जनता जनार्दन पाठीशी, मग काय कुणाची भीती", "जीत पक्की, टी.व्ही. नक्की" असे संदेश व्हायरल करताना दिसत आहेत.