लोकमत न्यूज नेटवर्कधारणी (अमरावती) : आएफओ दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेला डीएफओ विनोद शिवकुमार याला धारणी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती मिळताच अनेक महिला वनकर्मचारी, अधिकारी व राजकीय, सामाजिक क्षेत्रातील महिलांनी न्यायालयाबाहेर तोबा गर्दी केली. त्या गर्दीला चेहरा नव्हता, होता तो केवळ शिवकुमारविषयीचा संताप. त्या संतापातूनच शिवकुमारला महिलांनी घेरण्याचा प्रयत्न केला. महिला प्रचंड संतापल्या होत्या. पोलिसांनादेखील त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. मात्र, कायदा व सुव्यवस्था राखत पोलिसांनी शिवकुमारला सहिसलामत न्यायालयात आणले. न्यायालयात नेण्यापूर्वी आरोपी शिवकुमार हा धारणी पोलीस ठाण्यात होता. तेथे वनविभागाच्या अधिकारी व महिला कर्मचारी पोहोचल्या. आरोपीला न्यायालयात पायी नेण्याची मागणी करीत असताना, त्यांची पोलिसांशी बाचाबाची झाली. आरोपीला ज्या वाहनातून न्यायालयात नेण्यात आले, त्याला घेराव घालण्यात आला. महिला पोलिसांनी त्या महिलांना बाजूला करीत आरोपीला न्यायालयात आणले. लगेच महिला वनाधिकारी कर्मचारी महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी न्यायालय परिसरात धाव घेतली. तेथे आरएफओ शुभांगी डेहनकर, वनपाल प्रियंका येवतकर व वनरक्षक अनिता बेलसरे यांनी आरोपीला घेरण्याचा प्रयत्न केला. त्याला मारण्याचा प्रयत्नदेखील झाला. मात्र, पोलिसांमुळे त्यांचे हात आरोपीपर्यंत पोहोचू शकले नाही. न्यायालयाच्या प्रवेशद्वारसमोर आरोपीचे पोस्टर जाळण्यात आले. ‘विनोद शिवकुमार मुर्दाबाद’, ‘शिवकुमारला फाशीची शिक्षा द्या, चपलांनी मारा’, ‘महिलांचा अपमान सहन करणार नाही’, ‘नारीशक्ती जिंदाबाद’ अशा घोषणा देण्यात आल्या. न्यायालय परिसरात तारेच्या कुंपणाभोवती नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यांना पोलिसांनी हाकलून लावले. तरीही निकाल ऐकण्याकरिता व आरोपीला बघण्याकरिता प्रचंड गर्दी कायम होती.
गर्दीतील हात शिवकुमारकडे वळलेमहिला वनाधिकारी कर्मचारी महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी न्यायालय परिसरात धाव घेतली. तेथे आरएफओ शुभांगी डेहनकर, वनपाल प्रियंका येवतकर व वनरक्षक अनिता बेलसरे, भाजपच्या क्षमा चौकसे यांनी आरोपीला घेरण्याचा, मारण्याचा प्रयत्न केला. त्या प्रचंड संतप्त होत्या. दीपाली चव्हाणसारखी डॅशिंग अधिकारी आत्महत्या करते, तेथे वनरक्षक, वनपालाच्या जिवाचे मोल तरी काय, अशी संतप्त भावना व्यक्त करीत महिलांच्या गर्दीतील अनेक हात आरोपी शिवकुमारकडे मारण्यासाठी, त्याला घेरण्यासाठी वळले. मात्र, पोलिसांनी तो प्रयत्न हाणून पाडला.
एसडीपीओंनी मांडली बाजूएसडीपीओ संजय काळे यांनी आरोपीला दिवाणी फौजदारी न्यायालयासमोर उभे केल्यानंतर त्यांनी ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडीची मागणी केली. चव्हाण यांनी आरोपी शिवकुमारच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची सुसाईड नोटमध्ये सांगितले. ही माहिती आरोपीला होताच तो पळून गेला होता. त्याला अटक केल्यानंतर आरोपीने तपास कामी कोणतेही सहकार्य केले नाही. त्याने दीपाली चव्हाण यांना दिलेल्या नोटीस, कार्यालयीन रेकार्ड, लॅपटाॅप, मोबाईल, दैनंदिन डायरी आदी जमा करायचे आहेत. पीसीआर मिळाला नाही, तर तो पुरावे नष्ट करेल. त्यामुळे त्याला ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्याची मागणी केली.
बचावपक्षाकडूनही युक्तिवाद वकील सुशील मिश्रा यांनी विनोद शिवकुमारची बाजू मांडली. त्यामध्ये त्यांनी उपविभागीय अधिकारी यांनी मागितलेल्या तीन दिवसांच्या पोलीस कोठडीला विरोध करीत, घटनास्थळी जाण्याचे काम नाही, आरोपीकडील साहित्य जमा करण्याकरिता फक्त एकच दिवस लागतो. त्यामुळे तीन दिवस पीसीआर न देता फक्त एक दिवसाचा पीसीआर देण्यात यावा, असे म्हटले. न्यायालयाने ही मागणी फेटाळली.
शिवकुमारविरोधात वनकर्मचारी एकवटलेसुसर्दा वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी डेहनकर, वनकर्मचारी प्रियंका येवतकर, प्रियंका खेरडे, राणी गरुड, अनिता बेलसरे या कर्मचारी अधिकाऱ्यांनी न्यायालयाबाहेर शिवकुमारविरुद्ध संताप व्यक्त केला. भाजपच्या क्षमा चौकशे, महिला संघटनेच्या वंदना जावरकर, वर्षा जैस्वाल, सामाजिक वनीकरण अधिकारी ठाकूर, आप्पा पाटील यांनी उपविभागीय अधिकारी संजय काळे, ठाणेदार विलास कुलकर्णी यांच्याशी वाद घातला. आरोपीला घेरण्याचा प्रयत्न केला. एपीआय वर्षा खरसान, पीएसआय करुणा मोरे, पीएसआय रिना सरदार व महिला पोलिस कर्मचारी यांनी त्यांना दूर केले.
घटनेच्या तीन तासानंतर काढला शिवकुमारने पळ
गुरुवारी सायंकाळी ७ च्या सुमारास आरएफओ दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली. त्याआधी डीएफओ विनोद शिवकुमार हा हरिसाल परिसरात होता. सायंकाळच्या सुमारास तो चिखलदऱ्याला स्वत:च्या शासकीय निवासस्थानी गेला. फ्रेश झाला. मात्र, मोबाईलला रेंज नसल्याने सोशल मीडियावर काय व्हायरल होत आहे, यासोबत दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली, यापासून तो अनभिज्ञ होता. मात्र, रात्री १० च्या सुमारास त्याला चव्हाण यांच्या आत्महत्येची बातमी कुणी तरी मौखिक दिली. पोलीस सूत्रांनुसार, मोबाईलला रेंज आल्यानंतर तो नखशिखांत हादरला. तोपर्यंत दीपाली चव्हाण यांनी रेड्डी यांच्या नावे सुसाईड नोट लिहिली. त्यात आपले नाव असल्याचेदेखील त्याला कळले. त्याने लगेचच एक बॅग घेऊन शासकीय वाहनाने परतवाडा येथील कार्यालय गाठले. तेथे शासकीय वाहन ठेवून तो खासगी वाहनाने नागपूरकडे रवाना झाला. त्याला बंगळुरु येथे जायचे होते. त्याने तेथे जाणाऱ्या रेल्वेची वेळदेखील शोधली. शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास तो एका रेल्वेने बंगळुरुकडे पसार होणार होता. शुक्रवारी सकाळी त्याने नागपूर रेल्वे ठाणे गाठले व तो अलगद अमरावती ग्रामीण पोलिसांच्या तावडीत सापडला.
आपल्या संसाराला काळतोंड्याची नजर आरोपी विनोद शिवकुमारने दीपाली चव्हाण या गर्भवती असताना त्यांना जंगलात ट्रेकिंग करावयास भाग पाडले. त्यामुळे चव्हाण यांचा गर्भपात झाला. त्या अनुषंगाने मी आपल्या बाळाला गमावलं. मला माफ कर. तुला लग्नात दिलेली सगळी वचनं अर्धवट सोडून मी जात आहे. आपल्या संसाराला काळतोंड्याची नजर लागली, असे दीपाली चव्हाण यांनी पती राजेश मोहिते यांच्या नावे लिहिलेल्या चिठ्ठीत अत्यंत जड अंतकरणाने नमुद केले. आज मी तुला सोडून जात आहे. माझ्या आत्महत्येला सर्वस्वी जबाबदार विनोद शिवकुमार यास धरावे. त्याच्या मानसिक त्रासाला कंटाळून मी जीव देत आहे. आपला संसार अपूर्ण राहिला. पुढच्या जन्मी आपण नव्याने सुरुवात करू, असे पत्रात नमूद आहे.
आई, माझे सर्व सामान साताऱ्याला ने!आएफओ दीपाली चव्हाण यांनी पतीसह आईच्या नावे स्वतंत्र दोन पाने लिहिली. त्यात आईची माफी मागून स्वत:चे सर्व सामान साताऱ्याला नेण्याची विनंती केली. पती राजेश मोहिते यांच्यासाठी माझी कुठलीच आठवण ठेवू नको. त्याने दुसरे लग्न केल्यास आपल्याला आनंदच होईल. आई, माझ्या नोकरीतून काही पैसे मिळाले, तर त्यातून आपल्या घराचे हप्ते फेड, नाही तर ते घर विकून टाक. माझ्या दु:खात तुम्ही राहू नका. पप्पा व पप्पू गेल्यानंतर मी तुझी जबाबदारी घ्यायची होती, मात्र ती न स्वीकारताच जात आहे. त्याला विनोद शिवकुमारच जबाबदार आहे. त्याच्याच मानसिक त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचे अतिशय जड अंत:करणाने दीपालीने आईच्या नावे लिहिले.