अमरावती : भाजपला केंद्र आणि राज्यात सत्ता हाती मिळताच जुन्या, नवीन कार्यकर्त्यांना ‘अच्छे दिन’ आले आहे. मात्र, महत्त्वाची पदे हस्तगत करण्यासाठी सदस्य नोंदणीचे लक्ष्य वरिष्ठांनी दिले आहेत. त्यामुळे जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष पदावर डोळा ठेवत अनेकांनी सदस्य नोंदणीची लगबग सुरु केली आहे. जो जास्त सदस्य नोंदणी करेल, त्यालाच पद हा नवा फंडा भाजपात सुरु झाला आहे, हे विशेष.भाजपात लोकशाही प्रणालीने जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष व तालुकाध्यक्ष पदासाठी पक्षांतर्गत निवडणुका घेण्याचे धोरण आहे. या निवडणुकांचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी एप्रिल, मे महिन्यात पक्षांतर्गत निवडणुका होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजपत महत्त्वाची पदे काबीज करण्यासाठी जिल्ह्यातील नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. राज्य भाजप नेत्यांनी सदस्य नोंदणीचे दिलेले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी विविध शक्कली लढविली जात आहे. गत आठवड्यात भाजपने महाविद्यालय स्तरावर सदस्य नोंदणी अभियान राबविले. सदस्य नोंदणी राबविणाऱ्या नेत्यांच्या नावे ही संख्या गणली जात असून याच संख्येच्या आधारे पदे मिळणार आहे. त्यामुळे ज्यांना भाजपात पद काबीज करायचे आहे, अशा स्थानिक नेत्यांनी सदस्य नोंदणीचे अभियान राबवून पदासाठीची दावेदारी चालविली आहे. ३१ मार्च २०१५ पर्यंत सदस्य नोंदणी राबविली जात असून सर्वाधिक नोंदणी करणाऱ्यांना भाजपत पदे मिळण्याचे संकेत आहे. सर्वाधिक सदस्य नोंदणीनंतर सक्रिय सदस्य त्यानंतर महत्त्वाची पदे असा भाजपात नेत्यांचा प्रवास आहे. या प्रवासात वाटेकरी होण्यासाठी जिल्ह्यातील पदाधिकारी होण्याची इच्छा बाळगणाऱ्यांनी सदस्य नोंदणीला प्राधान्य दिल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)
भाजपात सदस्य नोंदणीची लगबग
By admin | Published: January 17, 2015 10:51 PM