अमरावती : मुलगा, मुलीचे लग्न जुळविताना आधी कुंडलीतील गुण जुळतात का, हे पाहिले जाते. ती पद्धत आजही आहे; परंतु आधुनिक युगात वधू-वरांची कुंडली जुळविण्यापेक्षा आरोग्याची कुंडली जुळविणे आता काळाची गरज आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. अनुवंशिक आजाराला खतपाणी न देता त्यावर आळा घालायचा असेल, तर हा निर्णय बहुतांशी योग्य आहे, असे वैद्यकीय तज्ज्ञांना वाटते.
काही जणामध्ये सिकलसेल हा एकल अनुवंशिक आजार आढळतो. लग्न जुळविताना अनेक जण ही बाब लपवितात; परिणामी लग्नानंतर हा एका परिवारातून दुसऱ्या परिवारात संक्रमण करतो. याच माध्यमातून सिकलसेल या आजाराचे रुग्णही आपोआप वाढतात. यासोबत इतर काही आजारांबाबतसुद्धा हे घडते; मात्र आज बहुतांश वधू-वरात लग्न कुंडलीसोबतच आरोग्याची कुंडली तपासणीवर भर दिला जात आहे.
बदलत्या काळानुरूप हे स्वरूप आता बदलले पाहिजे, असे मत आता तरुणांमधून व्यक्त होत आहे. शरीराला सुदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहाराचे सेवन करण्यावरही लक्ष देण्याची बाब आवश्यक आहे.
आरोग्य कुंडलीत काय पाहाल ?
संपूर्ण आरोग्य तपासणी -
संपूर्ण आरोग्य तपासणी ही आता सामान्य बाब झाली आहे. शरीरातील हिमोग्लोबीनचे प्रमाण किंवा रक्तात इतर आजारांची लक्षणे आहेत का, याची तपासणी सहजरीत्या केली जाते आणि ती आवश्यक आहे.
नात्यात लग्न नको -
तपासणीत आजार उद्भवला असेल आणि दोन्हीकडे किंवा एकीकडे सिकलसेल हा आजार असेल, तर जवळच्या नात्यात लग्न करू नका व ही बाब एकमेकांपासून लपवू नका.
सिकलसेल स्क्रीनिंग
शरीरात सिकलसेल हा आजार असेल, तर त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी स्क्रीनिंग होणे आवश्यक आहे. लग्न जुळविताना मुला-मुलींची सिकलसेल स्क्रीनिग करणे आवश्यक आहे. हाडाचे व्यंग, मेंदूचे आजार, रक्ताचे विकार जसे हिमोफिलिया, थॅलेसिमिया, सिकलसेल, ॲनिमिया हे आजारसुद्धा असू शकतात.
नियमित तपासणी करा
आपल्यामध्ये असलेल्या गुणसूत्रांमुळे निर्माण होणारे आजार व विकार कधी सुप्त असतात आणि आपल्याला त्याची कल्पना पण येत नाही. भविष्यात होणाऱ्या त्रासापासून वाचण्यासाठी होणाऱ्या वर आणि वधूची लग्न जुळवताना आरोग्य कुंडली मिळवणे गरजेचे आहे.
- डॉ. महेंद्र गुढे
लग्न जुळविताना एकमेकांच्या आरोग्याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. तपासणीनंतर प्रत्येक आजारावर उपचार आहेत. डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. कुठल्याही आजाराबाबत कधीही लपवू नका. नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे.
- डाॅ. सप्तेश शिरभाते
आरोग्य कुंडली का पाहिली जात नाही?
आता लग्न जुळविताना गुण मिळविण्यासोबतच आरोग्याची कुंडली पाहणेसुद्धा जरूरी आहे. कुठला आजार असेल वा नसेल, तर तपासणी करण्यास काहीच हरकत नाही.
- सागर पुनासे
आता लग्नाचे गुण जुळविताना आरोग्याची कुंडली जुळविणेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. दोन परिवार जुळत असताना आरोग्याविषयी माहिती लपविली जाऊ नये म्हणून आरोग्याबाबत माहिती जाणून घेणे गरजेचे आहे.