जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल : तत्कालीन आरडीसीकडून घेतले पैसेअमरावती: आधार कार्ड नोंदणी ही नि:शुल्क सेवा असताना शहरातील महा ई सेवा केंद्र (सेतू) मध्ये त्याकरिता २०० ते ३०० रुपये अतिरिक्त घेतले जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. एवढेच नव्हे तर तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना आधार कार्ड नोंदणीचे पैसे मागण्यात आल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी राजापेठ येथील सेतू केंद्राची चौकशी सुरु केली आहे.शिधापत्रिकांचे सर्वेक्षण केले जात असून ते स्मार्ट कार्डच्या रुपात तयार करण्याचे शासनाने ठरविले आहे. त्यानुसार येथील पुरवठा विभागाने शिधापत्रिकेत नावांचा समावेश करण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य केले आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे आधार कार्ड नाहीत, अशांनी ते बनविण्यासाठी सेतू केंद्रावर धाव घेतली आहे. अचानक सेतू केंद्रात वाढलेल्या गर्दीचा लाभ घेण्यासाठी संचालकांनी आधार कार्ड नोंदणीच्या लिंकसाठी पडद्यामागून अतिरिक्त पैसे उकळण्याचा धंदा सुरु केल्याने ओरड नागरिकांनी चालविली. हा प्रकार नियमबाह्य असल्याने भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अजय सारस्कर यांनी सेतू केंद्रात सुरु असलेल्या अनियमिततेची तक्रार जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याकडे सादर केली आहे. दरम्यान तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी हे मुलाचे आधार कार्ड बनविण्यासाठी सेतू केंद्रात गेले असता त्यांनाही सेतूच्या संचालकांनी पैशाची मागणी केली. हा प्रकार बघून तत्कालीन उपजिल्हाधिकारी अवाक् झाले. एकिकडे भाजयुमोची सेतू केंद्रात अनियमितता होत असल्याची तक्रार तर दुसरीकडे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना पैशाची मागणी करण्यात आल्याचे प्रकरण जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी गांभीर्याने घेत सेतू केंद्राच्या कारभाराची चौकशी होईस्तोवर आधार कार्ड नोंदणी थांबविली आहे. परिणामी राजापेठ येथील सेतू केंद्रात आधार कार्ड नोंदणीसाठी येणाऱ्यांना परत जाण्याचा प्रसंग ओढावत आहे. सेतू केंद्रात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची लूबाडणूक ही नित्त्याचीच बाब असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप देखील केला जात आहे. आधार कार्ड नोंदणीसाठी घेतल्या जात असलेल्या पैशाची पावती दिली जात नाही, असा प्रकार राजरोसपणे सुरु असल्याच्या गाऱ्हाणी आहेत. कामानिमित्त येणाऱ्यांंना रांगेत तासन् तास उभे राहण्याचा प्रसंग येत आहे. ३० एप्रिलपर्यंतच स्मार्ट रेशन कार्डचे कागदपत्रे सादर करावयाची मुदत असल्याने आधार कार्ड बनविण्यासाठी सेतू केंद्रात प्रचंड गर्दी वाढली आहे. शहरात राजापेठ, विद्यापीठ मार्ग, शेगाव, काँग्रेसनगर, हमालपूरा, प्रभादेवी मंगल कार्यालय समोर, बडनेरा याठिकाणी सुरु असल्याची माहिती आहे.सेतू केंद्रात सुरु असलेली अनियमितता थांबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. ज्या कामांचे शुल्क लागत नाही, त्याचेदेखील पैसे घेतले जात असेल तर ते थांबलेच पाहिजे. नागरिकांना होणारा त्रास व लूबाडणूक याविरुद्ध आवाज उठविला आहे.- अजय सारस्कर,अध्यक्ष, भाजयुमो.हल्ली आधार कार्ड नोंदणीसाठी सेतू केंद्रात प्रचंड गर्दी वाढत असून याचा फायदा संचालक घेत आहेत. एका आधार कार्ड नोंदणीसाठी चक्क दीडशे ते दोनशे रुपये घेतले जात आहे. ही गरीब, सामान्याची फसवणूक आहे. कठोर कारवाई व्हावी.- अशोक नंदागवळी,उपाध्यक्ष, रिपाइं.विद्यापीठ मार्गावरील सेतू केंद्रात आधार कार्ड नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे घेऊन गेले असतानाही शंभर रुपयांची मागणी करण्यात आली. ही रक्कम दिल्याशिवाय पर्याय नव्हता. मुलाचे आधार कार्ड नोंदणी करणे शिधापत्रिका नुतनीकरणासाठी गरजेचे आहे.आशा वानखडेगृहिणी, तपोवन परिसर.
सेतू केंद्रात लुबाडणूक; चौकशीचे आदेश
By admin | Published: April 25, 2015 12:36 AM