अमरावती : लुटमार करून पसार होणाऱ्या लुटारूंना पकडताना राजापेठ ठाण्यातील पोलीस कर्मचारी नीलेश गुल्हाने जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री जुन्या बायपास स्थित गोल्डन आर्कजवळ घडली.
राजापेठ पोलिसांनी या प्रकरणात सुनील एकनाथ कडू (५०, रा. जेवडनगर), पृथ्वी ऊर्फ भाऊ अशोक वानखडे (२४, रा. फ्रेजरपुरा) व आयुष नरेश मेश्राम (२१, रा. बडनेरा) या तिघांना अटक केली. दोन विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे.
पोलीस सूत्रांनुसार हॉटेल लार्ड येथील चौकीदार आकाश मुरलीधर ठाकरे (२१, रा. पारडी, ह.मु. गणपतीनगर) हा शुक्रवारी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास घरी जात असताना जुन्या बायपास मार्गावरील गोल्डन आर्क हॉटेलसमोर आकाशला आठ ते नऊ जणांनी रस्त्यात अडविले. त्यांनी आकाशला शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. आकाशला चाकूचा धाक दाखविला आणि त्याच्या खिशातील दहा हजार रुपये जबरीने हिसकावून घेतले. यासोबतच मोबाईल व व मोपेड वाहन असा एकूण ४५ हजाराचा मुद्देमाल हिसकावून पळ काढला. एका जणाने आकाशला एअरगन दाखविल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. राजापेठ पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून तासभरात आरोपींना अटक केली. पुढील तपास ठाणेदार मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक योगेश इंगळे करीत आहेत.