अमरावती : जुलै महिन्याच्या अखेरपासून पावसाचा ताण आहे. या महिनाभरात पावसाचे केवळ दोन ते सहा दिवस राहिले आहेत. यादरम्यान तुरळक ठिकाणीच हलका पाऊस पडल्याने वाढीच्या अवस्थेतील पिकांना ओढ लागली व तापमान वाढल्याने पिकांनी माना टाकल्या आहेत. सर्वांत कमी पाऊस असलेल्या दर्यापूर व अंजनगाव तालुक्यात बिकट स्थिती ओढावली आहे.
यंदाच्या खरिपात मान्सून तीन आठवडे विलंबाने आला. त्यानंतरही खंड पडला. फक्त जुलै महिन्यात पावसाची नोंद झाली. १ जून ते ३० ऑगस्टदरम्यान ६९९.३ मिमी. पावसाची सरासरी आवश्यकता असताना प्रत्यक्षात ४२९.५ मिमी. पावसाची नोंद झाली. ही ६१.४ टक्केवारी आहे. म्हणजेच पावसाचे ७५ दिवस संपले असताना ३९ टक्के पावसाची तूट आहे.
सध्या सर्वच पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. यामध्ये सोयाबीन बहरावर, तर कपाशी पात्या व फुलांवर आहे. अशा परिस्थितीत पिकांना पावसाची नितांत आवश्यकता असताना पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली व पिकांनी माना टाकल्या आहेत, अशीच स्थिती चार दिवस राहिल्यास बहुतेक भागातील खरिपाचा हंगाम हातचा जाण्याची स्थिती ओढावणार आहे.
शेतीचा झाला ‘पंचनामा’, हवी ७५ कोटींची मदत
मान्सूलला तीन आठवड्यांचा विलंब लागला तरी जुलैमध्ये दमदार कमबॅक केल्याने तब्बल ४२ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. या बाधित पिकांचे पंचनामे आता आटोपले आहेत. यामध्ये ७२,०७२ हेक्टरमध्ये पिकांचे नुकसान व ५२ हेक्टरमधील पिके खरडून गेल्याने २४.३८ लाख, अशी एकूण ७४.६४ कोटींची मागणी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी बुधवारी शासनाकडे केली.
अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचून सर्वाधिक ५३ कोटींचे नुकसान जिरायती पिकांचे झालेले आहे. याशिवाय बागायती पिकांचे ६२.२८ लाख तर फळपिकांचे २०.६१ कोटींचे नुकसान झाल्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल आहे. विभागीय आयुक्तांद्वारा बुधवारी शासनाला अहवाल पाठविण्यात आलेला आहे.