संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आरटीओने स्कूल बससंदर्भात दिलेल्या गाइड लाइननुसार ज्या शाळांमध्ये बाहेरील किंवा शाळेच्या मालकीच्या स्कूल बस लावल्या आहेत, त्यातून विद्यार्थ्यांना ने-आण करतात, अशा विशेषत: मुली या स्कूल बसमधून जातात, त्या ठिकाणी महिला अटेंडन्ट ठेवणे नियमाने अनिवार्य असताना अनेक स्कूलबसमध्ये महिला अटेंडन्टच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.शाळा सुरू झाल्यानंतरही अनेक स्कूल बस नियमबाह्य धावत असल्याचे निदर्शनास आले आहे. या स्कूल बसचे चालक आरटीओच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करीत आहेत. त्यामुळे चिमुकल्या मुलींची सुरक्षितता धोक्यात आली आहे. आरटीओच्या स्कूल बससंदर्भातील गाइड लाइननुसार स्कूल बसमध्ये पुरुष व महिला अटेंडन्ट ठेवणे अनिवार्य आहे. विशेषत: शाळा सुटल्यानंतर ज्या स्कूल बसमधून शेवटच्या विद्यार्थिनीला घरी सोडून देईपर्यंत महिला अटेंडन्ट नियमाने स्कूल बसमध्ये उपस्थित राहणे अनिवार्य आहे. शहरात शेकडो शाळा असून, जिल्ह्यात ६५० पेक्षा जास्त स्कूल बस व व्हॅनमधून हजारो विद्यार्थी रोज ये-जा करतात. पण, बोटावर मोजण्याइतक्याच शाळा सोडल्या, तर अनेक शाळाचालकांनी स्कूल बसमध्ये विद्यार्थी शाळेत येतात. त्या स्कूल बससंदर्भात नियमांना तिलांजली दिली आहे. प्रत्येक मोठ्या स्कूल बसमध्ये महिला अटेंडन्ट ठेवल्याच नसल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मोटार वाहन निरीक्षकांनी अशा स्कूल बसची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालक-मालकांवर कारवाईचा बडगा उगारावा. स्कूल बसमध्ये सर्व नियमांची पूर्तता केली आहे की नाही, याची जबाबदारी शाळांच्या मुख्याध्यापकांचीसुद्धा असून, त्यांनी अशा प्रकारची तपासणी करायला हवी. मुख्याध्यापक नियमात वागत नसतील, तर शिक्षणाधिकाºयांनी अशा शाळांची तपासणी करून कारवाईचा बडगा उगारायला हवा. चिमुकल्या विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे पाऊल उचलणे गरजेचे आहे. तसे पाऊल हे परिवहन व शिक्षण विभागाने गाइड लाइन देऊन उचलले आहे. पण महिला किंवा पुरुष अटेंडन्टचे पैसे वाचविण्यासाठी स्कूल बसचे चालक-मालकांनी नियम धाब्यावर बसविले. स्कूल बसमध्ये कुठलीही अनुचित घटना घडल्यास किंवा चिमुकल्या विद्यार्थिनींना अडचणीच्या वेळी जबाबदार कोण राहणार, असा प्रश्नही जागरुक पालकांना पडला आहे.काय आहेत नियम?स्कूलबस किंवा स्कूल व्हॅनसंदर्भात परिवहन विभागाने एक नियमावली दिली आहे. त्यामध्ये स्कूल व्हॅनचे फिटनेस करून घ्यावे तसेच शाळा सुरू होण्यापुर्वी दरवर्षी त्या बसेसची फेरतपासणी आरटीओकडून करून घ्यावी. शहरात व्हॅनचा वेग हा प्रति किमी ४० पेक्षा जास्त असू नये. बसवर शाळेचे नाव असावे. महिला व पुरुष अटेंडन्ट असले पाहिजे. काही अनुचित घटना घडू नये. अग्निशमन यंत्र असले पाहिजे. इमरजन्सी खिडकी असली पाहिजे. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी व्यवस्थित सीट व आरटीओने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त विद्यार्थी भरून वाहतूक करू नये, अशी नियमावली स्कूल व्हॅन व स्कूल बससंदर्भात ठरवून दिल्या आहेत. महिला अटेंडन्ट ही मोठ्या स्कूलबसमध्येच अनिवार्य आहे. लहान स्कूल व्हॅनमध्ये त्यासंदर्भाची तरतूद करण्यात आलेली नाही.२५ जून ते १४ जुलैपर्यंत स्कूल बस व व्हॅन तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. यासंदर्भात १५ ते २० स्कूल बसचालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. नियमानुसार स्कूल बस चालत नसतील, तर कारवाई करू.- रामभाऊ गिते, प्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती.
स्कूल बसमध्ये महिला अटेंडन्टला ‘खो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 10:39 PM
आरटीओने स्कूल बससंदर्भात दिलेल्या गाइड लाइननुसार ज्या शाळांमध्ये बाहेरील किंवा शाळेच्या मालकीच्या स्कूल बस लावल्या आहेत, त्यातून विद्यार्थ्यांना ने-आण करतात, अशा विशेषत: मुली या स्कूल बसमधून जातात, त्या ठिकाणी महिला अटेंडन्ट ठेवणे नियमाने अनिवार्य असताना अनेक स्कूलबसमध्ये महिला अटेंडन्टच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
ठळक मुद्देविद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात : नियमांचे उल्लंघन, शाळांची जबाबदारी