मोहन राऊतलोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : जन्म झाल्यानंतर त्यांना रडता आले, कुणी पाहिले तर हसता आले, जन्मदात्यांना ओळखता आले, मात्र जेव्हा चालण्यायोग्य झाले तेव्हा अवघ्या दोन वर्षांच्या वयात वाचा गेली. हात उचलणे बंद झाले. कंबरेपासून पाय लुळे पडले. आता तर कायमचे अपंगत्व आले आहे. अंथरुणापुरतेच त्यांचे आयुष्य सीमित झाले आहे. एकाच कुटुंबातील तिघांना हा विचित्र आजार जडला आहे.धामणगाव तालुक्यातील वर्धा नदीकाठावरील अडीच हजार लोकवस्तीच्या दिघी महल्ले या गावी कुंभार बांधवांची आठ ते दहा कुटुंबे राहतात. यातील शेतमजुरी करणारे विठ्ठल वझे यांना दोन मुले. यश नऊ वर्षांचा, तर नीलेश सात वर्षांचा. यशचा जन्म झाल्यानंतर ते हसत-खेळत-रडत असत. त्यांच्या शरीराच्या सर्व हालचाली होत होत्या. मात्र, दोन वर्षांचा होताच अचानकपणे बोलणे बंद झाले. त्याला धडपणे पायावर उभे राहणे जमत नव्हते. लगेच हातही लुळे पडले. काही दिवसांतच खुर्चीवर बसायला शक्य झाले नाही. अखेर यशला बिछान्याचा आधार घ्यावा लागला. प्रसूतिकाळातील चूक असेल, या भावनेतून दुसऱ्यांदा योग्य काळजी घेण्यात आली. मात्र, नीलेशचेदेखील दोन वर्षांचा होताच यशप्रमाणे बोलणे, चालणे, बसणे बंद झाले.
पोटाची खळगी भरायची कशी? विठ्ठल वझे व अमोल वझे आणि त्यांच्या पत्नींना शेतमजुरीवर गुजराण करावी लागते. दुसरीकडे मुलांचे विधी, ब्रशपासून निजेपर्यंत कुणीतरी जवळ असावेच लागते. आतापर्यंत त्यांनी अनेक दवाखाने केले. मात्र, आजार कोणता, हे लक्षात आले नाही. त्यातच उपचारासाठी पैसा उभा करायचा की पोटाची खळगी भरायची, हा प्रश्नही निर्माण झाला आहे.
सामाजिक, शैक्षणिक प्रगती अशक्ययश विठ्ठल वझे आज तिसऱ्या वर्गात आहे. त्याला विशेष शिक्षक वैभव गवते घरी येऊन शिकवत आहेत. यश पूर्णतः मतिमंद असल्याने मूलभूत गरजा, स्वतःचे काम स्वतः करणे अशा सामाजिक तसेच गोल काढणे, अक्षराची ओळख आदी शैक्षणिक प्रगतीसाठी प्रयत्न शक्य झाले नसल्याचे गवते यांनी सांगितले.
चुलतभाऊही झाला बहुविकलांगविठ्ठल वझे यांचा चुलतभाऊ अमोल वझे यांचा मुलगा आदित्यची स्थिती यश आणि नीलेशसारखी झाली आहे. वझे कुटूंबातील तिन्ही मुले आज बिछान्यावर आहेत. त्याच्या औषधोपचारासाठी वझे कुटुंबाने आतापर्यंत बराच खर्च केला. मात्र, तो अंथरुणालाच खिळला आहे.
प्रसूतीदरम्यान निष्काळजीपणा झाला, तर अपत्य मतिमंद जन्माला येऊ शकते. असे आजार आनुवंशिकतेमधून उद्भवतात. बहुविकलांगत्वावर एखादेच वेळी उपचार शक्य होतो. - डॉ. ऋषीकेश घाटोळ, बालविकास तज्ज्ञ, अमरावती