प्रतीकात्मक निषेध :
चांदूर बाजार : तालुक्यातील कर्मयोगी गाडगेबाबा यांचे श्री क्षेत्र नागरवाडी येथील रस्त्याचे बांधकाम जिल्हा परिषद प्रशासनाच्या आडकाठी धोरणामुळे रखडले आहे. गेल्या एका वर्षापासून सातत्याने मागणी करूनही हा रस्ता गटारात गेला असल्याचा आरोप वणी ग्रामपंचायतचे उपसरपंच मंगेश देशमुख यांनी केला आहे. हा रस्ता बांधकाम होत नसल्याने वणी येथील गावकऱ्यांनी गटारात लोटांगण घेत प्रतीकात्मक निषेध केला आहे.
वणी ते नागरवाडी हा रस्ता ३ किलोमीटरचा आहे. त्यानुसार वनी येथील गावकऱ्यांनी १५ जून रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यपालन अधिकारी तसेच बांधकाम विभागाला निवेदन देऊन रस्ता बांधकाम करण्याची मागणी केली होती. हा रस्ता बांधकाम करण्यास सुरुवात न झाल्यास आंदोलनाचा इशारा होता. मात्र दखल घेत नसल्याने अखेर वणी येथील गावकऱ्यांनी या रस्त्यावर साचलेल्या गटारीत लोटांगण घेऊन जिल्हा परिषद प्रशासन तसेच बांधकाम विभागाचा निषेध केला. यावेळी गावकऱ्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाच्या निषेध व्यक्त करत तीन तास गटारीत बसून आंदोलन केले. जिल्हा परिषद प्रशासनाने आपले आडमुठी धोरण सोडून हा रस्ता बांधकामाला सुरुवात न केल्यास या रस्त्यावरील गोळा झालेला गारा जिल्हा परिषद बांधकाम विभाग न्यून टाकणार असल्याचा इशारा ग्रामपंचायतचे उपसरपंच तसेच प्रहार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश देशमुख यांनी दिला आहे. आंदोलनावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश देशमुख, प्रफुल नवघरे, सुनील मोहोड, अमोल शेळके, वसंतराव नवघरे, नितीन शेळके, रवींद्र घोम, सागर धनसंडे, प्रफुल सोलव, संदीप ढोकळ, मयूर देशमुख, शरद शेळके, अनिल धर्माळे, अतुल राऊत सह शेकडो गावकरी उपस्थित होते.