चिखलदरा : तालुक्यात पाणीपुरवठा करणाऱ्या योजना कोरड्या पडल्याने ४० आदिवासी पाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अपुऱ्या टँकरमुळे पाण्यासाठी भटकंती, तर दुसरीकडे पाण्यासाठी ग्रामस्थांचे होणारे वाद पाहता टँकरचे पाणी थेट विहिरीत सोडले जात आहे.तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये मार्चपासूनच टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ३२ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत असला तरी आठ गावे टँकर्ससाठी प्रस्तावित केली आहेत. प्रत्यक्षात मात्र पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या अधिक आहे. तालुक्यातील मनभंग, आडनदी, भिलखेडा, कोयलारी, पाचडोंगरी, सोनापूर, धरमडोह, बहाद्दरपूर, पिपादरी, खिरपाणी, सोमवारखेडा, मलकापूर, कोरडा, तारूबांदा, लवादा, एकझिरा, बिहाली, कोहाना, भांद्री, खडीमल, गौलखेडा बाजार, कुलंगना, मोथा, पस्तलाई, नागझिरा, वस्तापूर, मोरगड, आलाडोह, शहापूर, अंबापाटी, खटकाली, झिंगापूर आदी गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. चिखलदरा तालुक्यातील ५५ ग्रामपंचायती अंतर्गत १६० गावांचा समावेश आहे.पाण्यावरून भांडणेअनियमित पाणीपुरवठ्यामुळे आदिवासींमध्ये रोज भांडणे होत आहेत. गुरुवारी सोमवारखेडा येथे टँकरने कमी फेºया केल्यामुळे आदिवासींमध्ये पाण्यावरून वाद निर्माण झाला. अहमदनगर व हैद्राबाद येथील कंत्राटदाराने जिल्ह्यात पाणीपुरवठा करण्याचा आॅनलाइन कंत्राट घेतल्यामुळे नियोजन कोलमडले. टँकरऐवजी ट्रॅक्टरने पाणीपुरवठा करून मोठी रक्कम शासनाकडून उकळण्याचा गोरखधंदा सुरू आहे. कमी अधिक प्रमाणात पाणी मिळाल्यावरून आदिवासींमध्ये वाद होत असल्याने विहिरीत सोडले जात आहे.हातपंप कोरडेतालुक्यात एकूण ३३७ हातपंप आहेत. पाणीपातळी खोल गेल्याने हातपंप कोरडे पडलेत. २५ हातपंप नादुरुस्त असून त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे पंचायत समितीमधून सांगण्यात आले.झेडपीचे टँकर उभेचजिल्हा परिषद अमरावती येथून चिखलदरा तालुक्यासाठी चार टँकर उपलब्ध करून देणार असल्याचे पत्र पंचायत समितीला प्राप्त झाले होते. त्यापैकी एकच टँकर पाठविण्यात आला. उर्वरित एमएचयू ६२२८, ६३४१, ६३४२ तीन क्रमांकाचे टँकर पाठविण्यात आले नाही. मेळघाटात प्रचंड पाणीटंचाई असताना तीनही टँकर जिल्हा परिषदमध्ये उभे आहेत.
चिखलदऱ्यातील ४० गावांत पाण्यासाठी हाहाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 1:11 AM