संचालक पदाचे वेध, आमदार राजकुमार पटेल यांचे नामांकन अवैध ठरल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या
अमरावती : ४ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या जिल्हा बँक निवडणुकीच्या अनुषंगाने माेर्चेबांधणीला वेग आला
आहे; मात्र आमदार राजकुमार पटेल यांचे नामांकन अवैध ठरविल्याने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातून अनेकांना संचालक पदाचे डोहाळे लागले आहेत. पॅनलमधून उमेदवारी घोषित व्हावी, यासाठी
उमेदवारांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
जिल्हा बँक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ८ सप्टेंबर रोजी नामांकन छाननीअंती वैध नामनिर्देशन पत्राची
यादी जाहीर केली आहे. यात अनुसूचित जाती, जमाती या प्रवर्गातून आठ उमेदवारांचे नामांकन वैध ठरविले
आहे. यात आमदार बळवंत वानखडे (लेहगाव), गोपाल चंदन (शिवर), संतोष कोल्हे (दर्यापूर), सुधाकर तलवारे
(अमरावती), रामेश्वर अभ्यंकर (अमरावती), मिलिंद तायडे (शिराळा), विजय वानखडे (भंडारज), प्रवीण
काशीकर (अमरावती) यांचा समावेश आहे. छाननी दरम्यान मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्या नामांकनावर माजी महापौर प्रवीण काशीकर यांनी हरकत नोंदविली होती. त्याअनुषंगाने आमदार पटेल
यांचे नामांकन निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अवैध ठरविले. तथापि, आमदार पटेल यांनी या निर्णयाला आव्हान देत ॲड. किशोर शेळके यांच्यामार्फत अपील दाखल केले आहे. या अपिलावर १४ सप्टेंबर रोजी
सुनावणी होणार आहे; मात्र आमदार राजकुमार पटेल हे आता संचालकपदाच्या निवडणुकीत बाद होतील,
अशी स्वप्ने उमेदवारांना पडू लागली आहेत. त्यामुळे वैध नामांकन असलेल्या एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांना पॅनलमध्ये कशी ‘एन्ट्री’ होईल, यासाठी जोरदार फिल्डिंग लावत आहे. सहकार अथवा परिवर्तन यापैकी कोणत्याही एका पॅनलमधून उमेदवार म्हणून नाव घोषित कसे होईल, याबाबत उमेदवारांनी नियोजन
चालविले आहे.
------------------
- तरच आमदार बळवंत वानखडे यांची उमेदवारी?
आमदार राजकुमार पटेल यांचे नामांकन तूर्त अवैध ठरविल्याने एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांना जिल्हा बँकेचे संचालकपद काबीज करण्यासाठी अनेकांना वेध लागले आहेत. याच प्रवर्गातून आमदार बळवंत वानखडे यांनीही संचालकपदाच्या निवडणुकीसाठी नामांकन दाखल केले आहे. आमदार पटेल यांच्या अपिलावर १४ सप्टेंबर रोजी सुनावणी होईल, त्यानंतरच आमदार बळवंत वानखडे हे मैदानात कायम राहतील अथवा माघार घेतील, अशी माहिती आहे. एससी, एसटी प्रवर्गातून वानखडे विरुद्ध पटेल अशा दोन आमदारांमध्ये लढतीची शक्यता आहे.