कॉमन
फोटो : २५ एएमपीएच ०३, ०४, ०५,०६, ०७, ०८
प्रदीप भाकरे
अमरावती : फुलांचा उल्लेख झाला की, सगळ्यात पुढे नाव असते ते कमळाचे. भारतीय वंशाची ही एक सदाहरित पाणवनस्पती. तलाव आणि पाणथळ जागांचे वैभव म्हणजे कमळाचे फूल. पाकळ्यांचा रंग गुलाबी, पांढरा शुभ्र व वेगळादेखील. फुलाला लांब देठ. पाण्यातून बाहेर आलेल्या लांबलचक देठावर कमळाचे मोठे फूल अगदी शोभून दिसते. फुलाला मंद सुगंध असतो तसेच त्यात असणाऱ्या मधुवर भ्रमर नेहमी रुंजी घालत असतात. असे सुंदर कमळ येथील एसआरपीएफ कॅम्पमध्ये उगवले आहेत.
महिला बचतगटाकडून उत्पादित वस्तू म्हटल्या की, डोळ्यांसमोर येते ती लोणचे अन् पापड. मात्र, त्यावर मर्यादित न राहता एसआरपीएफ कॅम्प आवारात वास्तव्याला असलेल्या महिलाशक्तीने थेट कमळाची शेती करण्याच्या यशस्वी क्षेत्रात उडी घेतली. त्यावर न थांबता कमळाच्या रोपविक्रीचा ‘सक्षम’ मार्ग त्यांनी पादाक्रांत केला आहे. त्यांनी कसलेल्या कमळ शेतीतून आता कमळांची रोपे तयार झाली आहेत. या रोपनिर्मितीमुळे राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक तथा आयपीएस हर्ष पोद्दार यांची संकल्पना आकारास आली आहे.
राज्य राखीव पोलीस दलातील जवानांच्या पत्नींचा सहभाग असलेला एक महिला बचतगट आहे. या महिला पूर्वी लोणची, पापड निर्मितीपुरत्या मर्यादित होत्या. त्यालादेखील कोरोना, लॉकडाऊन, अनलॉकमुळे मर्यादा आल्या. एसआरपीएफकडे स्वत:ची अशी सुमारे ३०० एकर जमीन आहे. त्यातील कसदार जमिनीवर समादेशक हर्ष पोद्दार यांनी कमळाच्या शेतीची संकल्पना मांडली. नाशिकहून कमलकंद मागविण्यात आले. ते एसआरपीएफ कॅम्पमधील टँकमध्ये फुलविण्यात आले. सुमारे एक हजार पाकळ्या असलेल्या ‘थौझंड पेटल’ या कमळाचीदेखील येथे निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय येथे हार्ट ब्लड, लेडी बिंग्लेरी, लियांग ली, न्यू स्टार, ग्रँड मास्टर, रेड सिल्क, पिंक क्लाऊड, वासुकी व बटर स्कॉच या २५ हून प्रजातीची कमळ रोपे आहेत.
बडी सोच
एकदा पोद्दार हे अंबादेवी मंदिरात गेले असता, त्यांनी कमळाचे फूल ३० रुपयांत खरेदी केले. त्या विक्रेत्यांकडे निवडकच कमळ फुले होती. त्यावेळी पोद्दार यांच्या डोक्यात कमळशेतीचा विचार चमकून गेला. ३५ महिलांच्या ‘सक्षम’ महिला बचतगटाच्या माध्यमातून त्यांनी ती संकल्पना प्रत्यक्षात उतरविली. कमळशेतीसह मधुपालन व मशरूम निर्मितीदेखील केली जाणार आहे.
म्हणून आहे मागणी
कमळाच्या फुलांना धार्मिक महत्त्व असल्यामुळे बाजारात त्याला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे तसेच कमळ काकडीलादेखील मागणी आहे. कमळाला ज्ञानाचे प्रतीक मानतात. कमळ चिखलात उगवते; परंतु चिखलाचा एकही वाईट गुण ते घेत नाही. ही गोष्ट आपल्याला खूप काही शिकवते. कमळ हे राष्ट्रीय फूल आहे.
कोट
महिला बचतगटांना आर्थिक उभारी देण्यासाठी कमळ कल्टिव्हेशनचा प्रयोग हाती घेतला. त्याला अल्प कालावधीत यश आले. कमळाचे रोप छोट्या पॉट, कुंडीतदेखील लावता येणे शक्य आहे.
- हर्ष पोद्दार, समादेशक, एसआरपीएफ बटालियन-९