जयघोष : शेकडो दिंड्यांचा समावेशचांदूररेल्वे : संत बेंडोजी महाराज यांच्या संजीवन समाधी दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लाखो भाविक येथे आले होते. सोमवारी दहिहंडी महोत्सवात लाखो भक्त सामील झाले होते. संत बेंडोजी महाराजांच्या ऐतिहासिक पालखी सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रातील ८३ दिंड्या सामील झाल्या. यावेळी लेझीम व हरिनामाच्या गजराने संपूर्ण घुईखेड नगरी दुमदुमली होती. घुईखेड येथील संत बेंडोजी महाराजांच्या पुण्यतिथी व यात्रा महोत्सवाला ९ फेब्रुवारीपासून सुरूवात होऊन १५ फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव उत्साहात पार पडला. तिर्थ व कलश स्थापना करून श्री संत बेंडोजी महाराजांचा लघुरुद्राभिषेक संस्थानचे अध्यक्ष वसंतराव घुईखेडकर यांच्या हस्ते करण्यात आला. सप्ताहात हभप खुशाल महाराज गोडबोले (यवतमाळ), हभप वासुदेव महाराज (दाभा), हभप गणेशपुरी महाराज (सार्सी कोठोडा), हभप संतोष महाराज जाधव, विजय महाराज गवाने (आळंदी), योगेश महाराज खवले यांचे कीर्तन झाले. सप्ताहात भाऊसाहेब घुईखेडकर, आप्पासाहेब काकडे, कमलाबाई सवाने, हरिभाऊ ठाणेकर, किशोर कडवे, भीमराव वानखडे, संजय कुचेवार, त्रिलोक टावरी आदी अन्नदात्यांनी अन्नदान केले. दररोज सामुदायिक प्रार्थना, काकडा आरती, ग्रामसफाई, रामधून, कीर्तनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. बजरंग मंडळ, गुरुदेव सेवा मंडळ व बाल भजनी मंडळ, भजनी मंडळ, वारकरी भजनी मंडळ जावरा, वारकरी महिला भजनी मंडळी घुईखेड, वारकरी भजनी मंडळ निमगव्हाण यांचे खंजेरी भजन झाले. सोमवारी सकाळी संत बेंडोजी महाराजांची सामूहिक आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर हभप उमेश महाराज (आळंदी) यांचे काल्याचे कीर्तन झाले. संत बेंडोजी महाराज यांच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. यामध्ये नगर, बीड, वर्धा, नांदेड, यवतमाळ यासह महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील आलेल्या महीला व पुरुषांच्या ८३ दिंड्या सहभागी झाल्या होत्या. लेझीम, बँड व भजनाच्या गजरात हरिनामाचा जयघोष संस्थानच्या शेतामध्ये पोहचला. शंभर वर्ष पूर्वीच्या चिंचीच्या झाडाजवळ दहिहांडीचा कार्यक्रम पार पडला. याचा लाभ लाखो भाविकभक्तांनी घेतला. सायंकाळच्या महाआरतीचा मान राज्यभरातून दाखल झालेल्या दिंड्याच्या नावाची ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. हा मान बाभुळगाव च्या सोनमाता महिला भजन मंडळाला मिळाला. या कार्यक्रमानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला अमरावती विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, जि.प. अध्यक्ष सतीश उईके, वीरेंद्र जगताप, जि. प. सदस्य प्रवीण घुईखेडकर, संस्थान अध्यक्ष वसंत घुईखेडकर, कोषाध्यक्ष दिनकर घुईखेडकर, बाळासाहेब देशमुख, सदस्य विजय घुईखेडकर, विवेक घुईखेडकर, शशीकांत चौधरी यासह गावकरी मंडळी सामील झाले होते. (तालुका प्रतिनिधी)
बेंडोजी महाराजांच्या दर्शनासाठी घुईखेडात लोटला जनसागर
By admin | Published: February 16, 2016 12:16 AM