सूरज दाहाट
तिवसा : अल्पवयीन बहीण प्रेमात पडल्याची चाहुल त्याला लागली. त्याने तिने समज दिली. मात्र, ती समज फेटाळून ती ‘त्याच्या’सोबत परागंदा झाली. पोलीस ठाण्यातून ती घरीदेखील परतली. मात्र त्या घटनेने जी सामाजिक बदनामी झाली, ती तिचा भाऊ विसरू शकला नाही. त्या रागातून वचपा म्हणून त्याने बहिणीच्या कथित प्रियकराची हत्या केली. चांदूर रेल्वे तालुक्यातील गावात हा ‘सैराट’ थरार घडला.
चांदूर रेल्वे येथील अक्षय नामक २२ वर्षीय युवकाने गावातील एका १७ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. पाहता पाहता भेटी गाठी सुरू झाल्या. ते प्रेम प्रकरण भावाला खटकले. ती वाहवत जाऊ नये, असा त्याचा कटाक्ष होता. मात्र, १७ ऑॅगस्ट रोजी अक्षयने तिला शिर्डी येथे पळवून नेले. २३ ऑगस्टला पोलिसांनी दोघांना शोधून आणले. मुलगी अल्पवयीन असल्याने त्या तरुणाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर तो गावात प्रेयसीला भेटण्यासाठी गावात पोहोचला. तेथेच त्याला खल्लास करण्यात आले. गावातील दोन अल्पवयीन मित्रांची सोबत घेण्यात आली.
अक्षय होता कबड्डीपटू
चांदूर रेल्वे येथील खडकपुरा येथील अक्षय अमदुरे हा उत्कृष्ट कबड्डी पटू होता. तो कबड्डीचे सामने खेळत होता. त्याचे वडील बांधकाम मिस्त्री असून आई मजुरी काम करते. त्याला तिघे भाऊ असून तो सर्वांत धाकटा होता.
आरोपींना पोलीस कोठडी
कुऱ्हा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहापैकी तीन आरोपी अल्पवयीन आहेत. त्यांना बालसुधारगृहात पाठविण्यात येईल. उर्वरित तिघांना न्यायालयासमोर उभे केले जाईल. कोठडीदरम्यान, घटनाक्रम उघड होण्याची शक्यता आहे.