त्रिनयन मालपे लोणीआलोडा शिवारात ऋषिबाबा लघुसिंचन प्रकल्पाचे काम मागील १४ वर्षांपासून सुरु आहे. यामुळे सिंचनाचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नसून सदर प्रकल्प कधी पूर्ण होणार, असा सवाल परिसरातील शेतकरी करीत आहेत. केवळ दफ्तरदिरंगाई आणि ठेकेदारांच्या लेटलतीफीमुळे प्रकल्पाचे काम रखडले आहे. शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्यावतीने सन २००२ मध्ये लोणीनजीक आलोडा शिवारात ऋृषीबाबा प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली. याकरिता ३ कोटी २५ लक्ष रुपये मंजूर झाले. ऋषिबाबा लघुसिंचन प्रकल्प लोणी परिसरातील शेतीसाठी पूरक ठरणारा आहे. याकरिता ६४ हेक्टर जमीन बुडीत क्षेत्रासाठी अधिग्रहित करण्यात आली. या जमिनीच्या ८० टक्के शेतमालकांनी २००४ मध्ये अनेकवेळा पाठपुरावा केल्याने शासनाने निर्णयानुसार मोबदला दिला. मात्र २० टक्के शेतकरी प्रकल्पग्रसांना अद्यापही मदत मिळाली नाही. वाढीव मोबदला बुडीत क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांना मिळाला नाही. या प्रकल्पाची उंची ९१.७० मीटर असून भिंतीची लांबी १,४५० मीटर आहे. यामुळे शेतकऱ्यांना पाझराचा लाभ मिळणार आहे. यातून काढण्यात येणाऱ्या कालव्यामुळे लाभ क्षेत्रातील हजारो हेक्टर जमिनीला लाभ होणार आहे. हा प्रकल्प फायदेशीर असल्याने तत्कालीन आमदार नरेशचंद्र ठाकरे यांनी पाठपुरावा करुन हा प्रकल्प मंजूर करवून आणला होता. या प्रकल्पाला पाणी कमी पडू नये म्हणून भविष्यातील नियोजन केले होते. यामध्ये वर्धा डायव्हर्शन सुपर एक्स्प्रेस कालव्यातून बेनोडा येथील धवलगिरी नदीत सोडून ते धवलगिरी नदीतून या प्रकल्पात सोडण्याचा बेत होता. परंतु सत्तांतरे झाले. आता विद्यमान आमदारांनी ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत तर अनेक प्रकल्प निधीअभावी रखडतील. कोट्यवधी रुपयांचा शासनाचा या प्रकल्पावर खर्च होऊनही प्रकल्प अपूर्ण अवस्थेत असल्याने शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ कधी मिळणार, हा प्रश्न चिंतेचा विषय आहे. कोट्यवधींचा खर्च होऊन ऋषिबाबा प्रकल्प पांढरा हत्ती ठरत असून १४ वर्षांनंतरही तहानलेलाच आहे.
लोणीचा ऋषिबाबा प्रकल्प १४ वर्षांपासून तहानलेलाच
By admin | Published: September 02, 2015 12:06 AM