अमरावती - शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने जालना येथे या आठवड्यात आयोजित राष्ट्रीय स्तरावरील पशुप्रदर्शनात परतवाडा येथील मदन नंदवंशी यांच्या दुधाळ म्हशीने तृतीय क्रमांक पटकावला. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते म्हशीचे मालक मदन नंदवंशी यांना ५० हजारांचे रोख बक्षीस देण्यात आले.
राष्ट्रीय स्तरावरील या पशुप्रदर्शनात अमरावती जिल्ह्यातील सहा उत्कृष्ट पशुधनांचा सहभाग होता. यामध्ये मंगरूळ दस्तगीर येथील प्रवीण देशमुख, एकलासपूर येथील रफीक खाँ गुलाब खाँ पठाण व परतवाडा येथील मदन नंदवंशी यांच्या दुधाळ म्हशी सदर प्रदर्शनात होत्या. नंदवंशी यांच्या रोज १२ लिटर दूध देणाऱ्या म्हशीला यामध्ये तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. या पशुप्रदर्शनात सहभागी होण्यासाठी पशुपालकांना शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने येण्या-जाण्याचे वाहतूक भाडे देण्यात येते. यामध्ये पशुपालकांना सहभागी होण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विजय रहाटे, डॉ. नैनेश कथले, डॉ. बी.बी. खान व डॉ. रवि सोणार यांनी प्रयत्न केले.
अशी आहे ‘नागपुरी म्हैस’ची ओळख
नागपुरी म्हशींचा देशात उत्कृष्ट दुधाळू प्रजातीमध्ये समाविष्ट आहे. मात्र, अलीकडे मोठ्या शहराची ओळख म्हणून ‘नागपुरी म्हैस’ असे नामानिधान करण्यात आले. नागपुरी म्हशीच्या दुधामध्ये फॅटचे प्रमाण ८.० पेक्षा अधिक असल्याने या प्रजातीच्या म्हशीला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. या जातीच्या म्हशीमध्ये वातावरणातील बदल व रोगप्रतिकारक शक्ती अधिक आहे.